क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू असतात, जे चाहत्यांना खूप आवडतात. चाहते या खेळाडूंकडून नेहमी खेळत राहण्याची अपेक्षा करत असतात. परंतु एक ना एक दिवशी या दिग्गज क्रिकेटपटूंनाही निवृत्ती घेत आपल्या क्रिकेट कारकिर्दीला राम राम ठोकावे लागते. हे जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेतात, तेव्हा तो क्षण चाहते आणि क्रिकेटपटू या दोघांसाठीही खूप भावनिक असतो.
कोणताही खेळाडू जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात करतो, तेव्हा त्याची सर्वात मोठी इच्छा असते, की तो एक दिवशी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करेल. यांपैकी काही भाग्यवान खेळाडूंना ही संधी मिळते. परंतु काही खेळाडू या संधीला मुकतात. तसेच, काही खेळाडू असेही असतात, जे वर्षानुवर्षे आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करतात आणि या दरम्यान ते अवघ्या जगभरात आपल्या संघाला एक वेगळे स्थान मिळवून देतात. हे खेळाडू लोकांचे आवडते बनतात आणि चाहत्यांना हे खेळाडू नेहमी खेळत रहावे असे वाटते. परंतु वयाने म्हणा किंवा त्यांच्या फॉर्मबद्दल त्यांना एके दिवशी निवृत्ती घ्यावीच लागते.
आज या लेखात आपण अशाच काही दिग्गज खेळाडूंचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेकदा धडाकेबाज कामगिरी केली आहे. परंतु काही काळानंतर त्यांनाही आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घ्यावी लागली. आणि तो क्षण चाहत्यांना पुरता भावुक करणारा बनवला.
आपल्या निरोप सामन्यात भावुक करणारे ५ दिग्गज खेळाडू- 5 Legendary Cricketers to get the most Emotional Farewells
५. सौरव गांगुली
सौरव गांगुली (Sourav Ganguly) असा कर्णधार होता, ज्याने भारतीय संघाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढले आणि एक वेगळे स्थान मिळवून दिले. त्याने संघ मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात असताना संघाला निर्भय होऊन खेळायला शिकवले आणि परदेशांत खेळताना विजय मिळविण्याचा मार्ग दाखविला. ग्रेग चॅपेलबरोबर झालेल्या वादानंतर असे वाटले, की तो पुनरागमन करू शकणार नाही. परंतु तरी त्याने दणक्यात पुनरागमन केले. इतक्या चांगल्या कारकिर्दीनंतर गांगुलीसारख्या इतक्या मोठ्या कर्णधाराचा क्रिकेटमधून निरोप घेतानाचा क्षण खूपच भावनिक राहिला.
६-१० नोव्हेंबर २००८ यादरम्यान नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यावेळी गांगुलीच्या सन्मानार्थ धोनीने त्याला सामन्याच्या शेवटच्या काही षटकांमध्ये नेतृत्व करण्यासाठी सांगितले आणि गांगुलीने त्याचा मान राखला. गांगुलीने आपल्या निरोप सामन्यात एकूण ८५ धावा केल्या आणि भारताने ऑस्ट्रेलियाला १७२ धावांनी पराभूत करत विजयी पताका फडकवली.
सामन्यानंतर संघाने आपल्या आवडत्या कर्णधाराला पाठीवर घेतले आणि गांगुलीने इतके वर्ष भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करत त्याला निरोप दिला.
४. लसिथ मलिंगा
श्रीलंकेचा लसिथ मलिंगा (Lasith Malinga) असा खेळाडू आहे, जो मागील काही वर्षांपासून श्रीलंकेच्या अपेक्षेचे ओझे आपल्या खांद्यावर वाहत आला आहे. परंतु त्याने कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. असे असले तरी मलिंगा टी२० क्रिकेटमध्ये अजूनही खेळत आहे. २६ जुलै २०१९ ला कोलंबो येथे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर मलिंगाने आपल्या वनडे कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे.
मलिंगाच्या शेवटच्या वनडे सामन्यादरम्यान कोलंबोचे आर प्रेमदासा स्टेडियम पूर्णपणे भरले होते. त्यादरम्यान त्याच्या कुटुंबातील व्यक्तीही उपस्थित होते. आपल्या शेवटच्या निरोप सामन्यात मलिंगाने ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच सामन्यानंतर त्याला अविस्मरणीय असा निरोप देण्यात आला. मलिंगाने युवा खेळाडूंना संधी देण्याबद्दल सांगितले आणि म्हटले, की निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे.
३. मुथय्या मुरलीधरन
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० विकेट्स घेत इतिहास रचणाऱ्या मुथय्या मुरलीधरनचा निरोप सामना खूपच भावुक करणारा राहिला. २०११च्या विश्वचषकात श्रीलंकेचा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. तसेच, तो मुरलीधरनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामनाही होता.
श्रीलंका संघाला विश्वचषकाची ट्रॉफी मुरलीधरनला भेट म्हणून द्यायची होती. परंतु असे होऊ शकले नाही. २ एप्रिलला जसे धोनीने नुवान कुलसेखराच्या चेंडूवर शेवटचा षटकार ठोकला, तसे मुरलीधरनच्या १९ वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीचा दु:खद शेवट झाला. एकीकडे भारतीय संघाने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर घेत त्याला विश्वचषकाची अविस्मरणीय भेट दिली होती, तर दुसरीकडे फिरकीचा जादूगार मुरलीधरन शांतपणे क्रिकेटला भावुक निरोप देत होता. तो क्षण खूपच भावुक होता.
२. ब्रायन लारा
वेस्ट इंडिजचा डाव्या हाताचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) जेव्हा आपल्या लयीत खेळायचा, तेव्हा त्याला पाहून प्रत्येकजण हक्के-बक्के होत असायचे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ११९५३ आणि वनडेत १०४०५ धावा केल्या आहेत. नेहमीच सचिन आणि लारामध्ये तुलना होत असायची. परंतु लारासारखा दिग्गज फलंदाज कधीच आकडेवारीच्या गोंधळात पडला नाही आणि शांतपणे आपले काम करत राहिला.
२००७चा विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये खेळण्यात येत होता. त्यावेळी मोठी बातमी येत होती, की लाराला त्यानंतर संघातून वगळण्यात येईल. परंतु त्यापूर्वी लाराने स्वत:च निवृत्ती घेण्याची घोषणा केली. त्याने २१ एप्रिल, २००७ रोजी इंग्लंडविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या सामन्यात त्याने केवळ १८ धावा केल्या. तसेच, विंडीजला केवळ १ धावेने पराभवाचे तोंड पहावे लागले. जेव्हा तो बाद होऊन पव्हेलियनच्या दिशेने जाऊ लागला, तेव्हा इंग्लंडच्या खेळाडूंनी दोन्ही बाजूंनी उभे राहत त्याला अविस्मरणीय निरोप दिला. परंतु इतक्या मोठ्या खेळाडूला पराभवाचा सामना करत निरोप घ्यावा लागला.
१. सचिन तेंडुलकर
१५९२१ कसोटी धावा, १८४२६ वनडे धावा, शतकांचे शतक हे आकडे दाखवतात, की भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) उगाच दिग्गज खेळाडू म्हटले जात नाही. २४ वर्षांपर्यंत भारतीय संघाच्या अपेक्षांचे ओझे वाहणाऱ्या सचिनने जेव्हा आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, तेव्हा प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
१४-१६ नोव्हेंबर, २०१३ दरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये सचिनने आपल्या कारकिर्दीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सामन्यानंतर जेव्हा निरोप भाषण देऊ लागला, तेव्हा सचिनसमवेत स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक आणि टी.व्ही. पाहणाऱ्या चाहत्यांच्या डोळ्यांतून अश्रू येत होते. प्रत्येकजण यामुळे खूप भावुक झाला होता, की सचिनला आता पुन्हा कधीच त्या खेळपट्टीवर धडाकेबाज कारनामे करताना पहायला मिळणार नाही.
तसेच त्याच्या निरोपावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये सचिन, सचिन…असा गजर होत होता. त्यावेळी अनेक दिग्गज खेळाडूही स्टेडियममध्ये उपस्थित होते.
वाचनीय लेख-
-२० जून का आहे भारतीय क्रिकेटसाठी सर्वात खास? घ्या जाणून
-जेव्हा १७ वर्षांपुर्वी दु:खात आख्खा देश झाला होता लाॅकडाऊन
-गोष्ट अशा व्यक्तीची, ज्याने सचिनला एका रात्रीत बनवले करोडपती