भारतीय क्रिकेट इतिहासात नेहमीपासूनच मोठ-मोठे खेळाडू होऊन गेले आहेत. प्रत्येक खेळाडूच्या जर्सीचा एक क्रमांक असतो, जी त्या खेळाडूची ओळख बनलेली असते. जेव्हा तो खेळाडू आपल्या जर्सीच्या मागे लिहिलेल्या क्रमांकावरून ओळखला जातो, तेव्हा त्याला भलताच आनंद होत असतो.
प्रत्येक दिग्गज खेळाडूंच्या जर्सी क्रमांकाची एक वेगळीच ओळख असते, असे म्हणणे वावगं ठरणार नाही. परंतु असे अनेकवेळा होते, की जेव्हा खेळाडू मैदानावर नसतो किंवा तो निवृत्ती घेतो, तेव्हा त्या क्रमांकाच्या जर्सीचा वापर इतर खेळाडू करतात. परंतु हे त्या खेळाडूंसाठी निराशाजनक असते. कारण त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
अशामध्ये हेदेखील म्हणणे चूकीचे ठरणार नाही, की सर्व क्रिकेट बोर्डांनी आपापल्या दिग्गज खेळाडूंना सन्मान देत त्यांचा जर्सी क्रमांक निवृत्त केले पाहिजे.
या 5 खेळाडूंचा जर्सी क्रमांक केला पाहिजे निवृत्त- 5 Legends Retired Jersey Number
1. सचिन तेंडुलकर
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) जागतिक क्रिकेटमध्ये जवळपास 24 वर्षे अधिराज्य केले आहे. सचिनने लहान वयामध्ये असे मोठ- मोठे कारनामे केले, की त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या नावाची चर्चा सुरु झाली. महान फलंदाज सचिनने फलंदाजीतील जवळपास सर्वच विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
यांमधील अनेक विक्रम आजही कायम आहेत आणि त्याच्याजवळही कोणी नाही. सचिनने 100 शतके ठोकली आहेत. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. आता जर आकडेवारीची चर्चा करायची झाली, त्याने 200 कसोटी सामन्यांमध्ये 51 शतक आणि 68 अर्धशतकांच्या मदतीने 15921 धावा केल्या आहेत.
तसेच, वनडेत त्याने 463 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 49 शतके आणि 96 अर्धशतकांच्या मदतीने 18426 धावा केल्या आहेत. सचिनच्या जर्सीचा क्रमांक हा 10 राहिला आहे. त्याने सुरुवातीपासूनच या क्रमांकाला आपला लकी क्रमांक मानला आणि 24 वर्षांपर्यंत मैदानावर चमकदार कामगिरी केली. त्यामुळे बीसीसीआयला सचिनच्या जर्सी क्रमांकाला निवृत्ती दिली पाहिजे.
2. रिकी पाँटिंग
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आपल्या दिग्गज खेळाडूंच्या मदतीने क्रिकेट जगतावर राज्य केले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला 2003 आणि 2007 चा विश्वचषक जिंकून दिला आहे. पाँटिंग एक उत्कृष्ट कर्णधाराबरोबरच त्याने आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे.
पाँटिंग कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविण्याच्या बाबतीत सचिननंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो. तसेच, वनडेत तो तिसऱ्या क्रमांकावर येतो. आकडेवारीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 168 कसोटी सामन्यांमध्ये 41 शतके आणि 62 अर्धशतकांच्या मदतीने 13378 धावा केल्या आहेत. तसेच, 375 वनडे सामन्यांमध्ये 30 शतके आणि 82 अर्धशतकांच्या मदतीने 13704 धावा केल्या आहेत.
पाँटिंग ऑस्ट्रेलिया संघाच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाँटिंगच्या शानदार योगदानाच्या सन्मानार्थ त्याच्या जर्सी क्रमांक 14ला निवृत्त केले पाहिजे.
3. मुथय्या मुरलीधरन
श्रीलंका क्रिकेट संघाचा फिरकी जादूगार मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) आपल्या काळातील दिग्गज फलंदाजांसाठी चितेंचा विषय ठरत होता. तसेच, फलंदाज मुरलीधरनसमोर फलंदाजी करण्यापूर्वी विचार करत होते. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा आपल्या नावावर केला आहे.
मुरलीधरनच्या आकड्यांवर पाहिले, तर ते नक्कीच प्रशंसनीय आहे. त्याने 133 सामन्यांमध्ये 22.72 च्या सरासरीने 800 विकेट्स घेतल्या आहेत. ज्या आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये घेण्यात आलेल्या सर्वाधिक विकेट्स आहेत. कोणत्याही गोलंदाजाला हा विक्रम मोडता आलेला नाही.
याव्यतिरिक्त वनडे क्रिकेटमध्ये मुरलीधरनने 350 सामन्यांमध्ये 23.08 च्या सरासरीने 534 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या जर्सीचा क्रमांक 800 राहिला आहे. त्याचे योगदान पाहता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याच्या जर्सी क्रमांकाला निवृत्त केले पाहिजे.
4. जॅक कॅलिस
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसने (Jacques Kallis) आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने कॅलिसच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीला पाहता त्याच्या सन्मानार्थ त्याच्या जर्सी क्रमांक 3 ला निवृत्त केले पाहिजे.
कॅलिसने 166 कसोटी सामन्यांमध्ये 45 शतके आणि 58 अर्धशतकांच्या मदतीने 13289 धावा केल्या आहेत. तसेच, 32. 65 च्या सरासरीने त्याने 292 विकेट्सही घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त 328 वनडे सामन्यांमध्ये त्याने 17 शतके आणि 86 अर्धशतकांच्या मदतीने 11579 धावा केल्या आहेत. तसेच, 31.79 च्या सरासरीने त्याने 273 विकेट्सही घेतल्या आहेत.
कॅलिसने आपल्या कारकिर्दीत 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 5 अर्धशतकांच्या मदतीने 666 धावा केल्या आहेत. तसेच, 12 विकेट्सही घेतल्या आहेत.
5. एमएस धोनी
भारतीय संघाचा माजी फलंदाज एमएस धोनीने (MS Dhoni) आपल्या नेतृत्वात भारताला 3 विजेतेपद जिंकून दिले आहेत. ती म्हणजे, 2007 सालचा टी20 विश्वचषक, 2011चा वनडे विश्वचषक आणि 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी होय. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टीरक्षक आणि फिनिशर म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.
धोनी येत्या काही काळांमध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. या सर्वांव्यतिरिक्त धोनीचे योगदान पाहता त्याच्या सन्मानार्थ त्याच्या जर्सी क्रमांक 7 ला निवृत्त केले पाहिजे.
धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी धोनीची प्रशंसा केली आहे. तसेच करतातही. धोनीची आकडेवारी पाहिली, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 90 कसोटी सामन्यांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 2014मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
तसेच, 350 वनडे सामने खेळताना त्याने 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 10 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 37.60 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत.
वाचनीय लेख-
-आपल्या फलंदाजीने सर्वांना भूरळ पाडणारे जगातील ३ धडाकेबाज खेळाडू
-वनडेत धोनीने त्या ३ धडाकेबाज खेळी करूनही भारताच्या पारड्यात आले नाही यश
-सुरुवातीच्या १५ वनडे सामन्यात मैदान गाजवत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज