आजवर वनडेमध्ये अनेक अविस्मरणीय सामने खेळण्यात आले. अनेक सामने चाहत्यांच्या मनात घर करुन राहिले. यातीलच एक सामना म्हणजे 12 मार्च 2006 रोजी झालेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामना. हा सामना वनडेतील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2006 साली पाच वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेतील पाचवा वनडे सामना दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झाला होता. पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीवर होते. त्यामुळे या सामन्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गिलख्रिस्ट(55) व कॅटिच(79)च्या चांगल्या सलामीने मोठ्या धावसंख्येचा पाया घातला. गिलख्रिस्ट आऊट झाल्यावर फलंदाजीला आलेल्या रिकी पाँटिंगने तर धावांचा रतीबच घातला. पाँटिंगने 105 चेंडूत 13 चौकार आणि 9 षटकारांच्या साहाय्याने 164 धावांची नेत्रदिपक खेळी केली. त्याला माईक हसी(81) व सायमंड्स(27)ची साथ मिळाली. पाँटिंगच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 434 धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत केवळ 4 विकेट्स गमाविल्या होत्या.
या सामन्यात हर्षल गिब्जला संधी मिळण्याची शक्यता नव्हतीच. यामुळे गिब्ज सामन्याच्या आदल्या रात्री वाईन घेत बसला होता. नेथन ब्रेकन आणि माईक हसी हेे ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू यावेळी डिनरसाठी बाहेर जात होते. तेव्हा त्यांना गिब्ज वाईन घेताना दिसला होता.
यानंतर जेव्हा ते ३ तासांनी परत आले तेव्हाही गिब्ज त्यांना वाईन घेताना दिसला. त्यानंतर जेव्हा हसी झोपण्यासाठी १ तासांनी गेला तेव्हाही गिब्ज त्याच जागी होता. यानंतर सकाळी जेव्हा कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि प्रशिक्षक माईक अथर्टन हे ब्रेकफास्टसाठी जमले तेव्हा अर्धवट झोप आणि अर्धवट नशेतच गिब्जही ब्रेकफास्टला आला होता.
यामुळे त्याला संघात संधी मिळणे जवळपास संपलेच होते. अशा वेळी सामना सुरु होण्यासाठी केवळ १ तास राहिला असताना गिब्जचा संघात समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीच्या वेळी स्मिथसह थेट सलामीला फलंदाजीला उतरला. कर्णधार ग्रॅमी स्मिथ(90) आणि हर्शेल गिब्जच्या फलंदाजीने 435 धावांचे आव्हान टप्प्यात आणले.
गिब्जने घणाघाती फलंदाजी करत केवळ 111 चेंडूत 21 चौकार आणि 7 षटकारांच्या साहाय्याने 175 धावा केल्या. त्याला मार्क बाऊचरच्या 50 धावांची साथ मिळाली. अंतिम षटकाच्या शेवटून दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत बाऊचरने दक्षिण आफ्रिकेचा विजय साकार केला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन ब्रॅकनने 5 विकेट घेतल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
सामनावीराचा पुरस्कार रिकी पाँटिंग आणि हर्शेल गिब्जला विभागून देण्यात आला. तर मालिकावीर शॉन पोलॉक ठरला. ऑस्ट्रेलियाच्या मिक लुईसने वनडे क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात खराब गोलंदाजी करण्याचा विक्रम केला. त्याने 10 षटकात तब्बल 113 धावा दिल्या होत्या.






