आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट संघाची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी राहिली आहे. भारतीय संघाला विश्वचषकाच्या सुपर १२ मध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे आता संघाला उपांत्य फेरी गाठणे फार कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडू आणि संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारतीय संघाला पहिल्यांदा पाकिस्तानने हरवले त्यांनंतर न्यूझीलंडविरुद्ध पराभव पचवावा लागला. त्यामुळे विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचे कारण म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकही मोठे जेतेपद आपल्या नावावर करू शकलेला नाही.
या टी-२० विश्वचषकानंतरच विराट कोहली टी-२० कर्णधारपद सोडणार आहे, पण कर्णधार म्हणून कोहलीचे अपयश पाहता त्याचे एकदिवसीय कर्णधारपदही हिरावून घेतले जाऊ शकते. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेऊन बीसीसीआय भारतीय संघासाठी एका नवीन कर्णधाराच्या शोधात असेल, जो विश्वचषकासारखी स्पर्धा जिंकू शकेल. २०२३ च्या विश्वचषकापर्यंत विराट कोहली ३४-३५ वर्षांचा होईल.
या लेखात आपण अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, जे भविष्यात भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद भुषवू शकतात.
रोहित शर्मा
रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा (टी२० आणि एकदिवसीय) उपकर्णधार आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद संभाळताना संघाला त्याने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते. रोहितने २२४ एकदिवसीय सामने खेळले आहेत त्यात त्याने ४८.९६ च्या सरासरीने ९२०५ धावा केल्या आहेत. त्यात त्याने २९ शतके आणि ४३ अर्धशतके लगावली आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये त्याने ११३ सामन्यात २८७८ धावा केल्या आहे. तसेच त्याने चार शतके देखील ठोकली आहेत. त्यामुळे रोहित हा प्रबळ दावेदार असेल एकदिवसीय आणि टी२० कर्णधार पदासाठी.
केएल राहुल
केएल राहुल उत्कृष्ट फलंदाज तसेच यष्टीरक्षक देखील आहे. त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचे देखील नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने मोठे यश मिळवले नसले तरी बरी कामगिरी केली आहे. केएल राहुलने भारतीय संघाकडून ३८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४८.६८ च्या सरासरीने १५०९ धावा केल्या आहेत. त्याने पाच शतके आणि नऊ अर्धशतकं झळकावली आहेत.
रिषभ पंत
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत पुढील कर्णधार बनू शकतो. पंतने गेल्या काही महिन्यांत भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच तिन्ही प्रकारामध्ये त्याचे स्थान पक्के झाले आहे. रिषभ पंत उत्कृष्ट कर्णधार देखील आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना पंतने चमकदार कामगिरी केली होती.
श्रेयस अय्यर
मुंबईचा २६ वर्षीय फलंदाज श्रेयस अय्यरने २०१७ मध्ये भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. कर्णधारपदाबद्दल बोलताना, अय्यरची आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने शानदार कामगिरी केली आहे. २०१९ साली दिल्ली संघ त्याच्या नेतृत्वाखाली ७ वर्षांनी आयपीएल प्लेऑफमध्ये पोहचला होता, तर गेल्यावर्षी दिल्लीने प्रथमच आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती.
श्रेयस अय्यरला देशांतर्गत क्रिकेटमध्येही नेतृत्त्वाचा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जाते.
शुभमन गिल
शुभमन गिलने २०१९ देवधर ट्रॉफीमध्ये कर्णधारपद भूषवले होते. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत क संघ अंतिम फेरीत पोहोचला. २०२३ च्या विश्वचषकानंतर भारतीय संघाची कमान शुबमन गिलकडे मिळण्याची शक्यता आहे.
शुभमन गिलने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण केले. शुभमन गिलने जगातील सर्वोत्तम गोलंदाज पॅट कमिन्सचा चांगलाच सामना केला होता. याशिवाय भारतीय संघाच्या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“जसा भारतासाठी एमएस धोनी, तसाच इंग्लंडसाठी ओएन मॉर्गन”, भारतीय क्रिकेटरकडून कौतुक
न्यूझीलंडविरुद्ध उतरणार भारताची ‘यंग ब्रिगेड’; ऋतुराजसह हे खेळाडू असणार संघाचा भाग