जेव्हा एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करतो, तेव्हा त्याच्या चाहत्यांना सर्वात मोठा धक्का बसतो. या आठवड्यात एक-दोन नव्हे, तर चक्क 5 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे! याची सुरुवात टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवनपासून झाली. या लेखात आम्ही तुम्हाला अशा 5 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
(5) बरिंदर सरन – भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर सरन यानं गुरुवारी (29 ऑगस्ट) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. सरननं 2016 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतासाठी पदार्पण केलं होतं. त्यानं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 8 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 13 बळी घेतले.
(4) विल पुकोवस्की – 29 ऑगस्टलाच ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज विल पुकोवस्कीच्या निवृत्तीची बातमी समोर आली. या 26 वर्षीय खेळाडूला डोक्याला अनेक वेळा दुखापत झाल्यानं निवृत्ती घ्यावी लागली. या दुखापतींमुळे त्यांच्या मनात भीती बसली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पुकोवस्कीनं क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
(3) शॅनन गॅब्रिएल – वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रिएलनं 28 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गॅब्रिएलनं 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलं होतं. तो 2023 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळला. गॅब्रिएलनं कॅरेबियन संघासाठी 59 कसोटी, 25 एकदिवसीय आणि 2 टी20 सामने खेळले. यामध्ये त्याच्या नावे एकूण 202 बळी आहेत.
(2) डेव्हिड मलान – या आठवड्यात निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा दिग्गज फलंदाज डेव्हिड मलानचंही नाव शामिल आहे. मलान 2023 विश्वचषकापासून संघाबाहेर होता. तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत बराच काळ अव्वल स्थानावर राहिल्यानंतर चर्चेत आला होता. या स्फोटक फलंदाजानं आपल्या कारकिर्दीत 22 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 62 टी20 सामने खेळले, ज्यात एकूण 4416 धावा केल्या.
(1) शिखर धवन – एकेकाळी शिखर धवनची टीम इंडियाचा सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून गणना व्हायची. मात्र तो गेल्या बराच काळापासून खराब फॉर्ममुळे संघाबाहेर होता. यामुळे त्यानं 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची घोषणा केली. या डावखुऱ्या फलंदाजानं भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले, ज्यात एकूण 10867 धावा केल्या.
हेही वाचा –
विकेट घेतल्यानंतर जमिनीवर लोळायला लागली, महिला खेळाडूचं हे कसलं अनोखं सेलिब्रेशन!
ऑलराउंडर रिंकू! आधी बॅटनं केला कहर, मग चेंडूनं बदलून टाकली संपूर्ण मॅच
कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणं सर्वात कठीण जातं? जसप्रीत बुमराहनं दिलं अनोखं उत्तर