विराट कोहली आता जवळपास एक वर्षाहून अधिक काळ भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून तो भारतीय क्रिकेटचे तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व करत आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात भारताने कसोटी वनडे आणि टी-२० मध्ये निर्भेळ यश मिळवले.
२०१९च्या विश्वचषकासाठी कोर संघ बनवण्याचे काम भारतीय नियामक मंडळाने चालू केले आहे. त्यामुळेच सलग २ मालिकेत भारत आपल्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली आहे. श्रीलंकेत भारताने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात निर्भेळ यश मिळवले आणि आता ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा होणार आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने हे आधीच मान्य केले आहे की ही मालिका श्रीलंकेएवढी सोपी नसणार आहे. या मालिकेत जर भारताला यश मिळवायचे असेल तर वैयक्तिक कामगिरी बरोबरच सांघिक कमागिरीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच बरोबर निवड समितीचे ही या मालिकेवर विशेष लक्ष असेल. या मालिकेतून भारताच्या विश्वचषकासाठीचा कोर संघ निवडण्यात येईल.
या मालिकेत काही असे खेळाडू खेळत आहेत ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. ही मर्यादित षटकांची मालिका अनेक खेळाडूंचं भविष्य ठरवणार आहे.
५. मनीष पांडे
२०१९च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात मागील १ वर्षापासून चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार या वर चर्चा चालू आहे. संघात जवळ जवळ १० वर्षांपेक्षा जास्त काळ खेळलेल्या सुरेश रैनाला खराब फॉर्ममुळे संघाबाहेर जावे लागेल. त्यानंतर या क्रमांकावर बऱ्याच खेळाडूंना खेळवण्यात आले आहे, त्यात केदार जाधव केएल राहुल यांचा समावेश आहे.
पण या क्रमांकासाठी सर्वोत्तम फलंदाज म्हणून मनीष पांडेने आपली जागा सुनिश्चित केली आहे असे म्हणायला हरकत नाही. पांडेला भारताबाहेर खेळण्याचा अनुभव आहे, त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रलियात जाऊन शतक केले आहे. त्याच बरोबर तो धडाकेबाज फलंदाज आहे आणि मैदानावर आल्यावर पहिल्या चेंडूपासून फाकेबाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.
पांडेसाठी ही मालिका खूप महत्वाची आहे कारण या मालिकेत जर त्याने चांगली कामगिरी केली तर त्याचे २०१९च्या विश्वचषकाच्या संघात स्थान पक्के होईल.
४. अक्षर पटेल
रवींद्र जडेजा हा जर फक्त कसोटी क्रिकेटचा खेळाडू आहे तर मग भारतासाठी वनडे आणि टी-२० मध्ये त्याची जागा कोण घेणार हा जर एक प्रश्न असेल तर त्याचे उत्तर म्हणजे अक्षर पटेल.
जडेजाला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती कारण सततच्या क्रिकेटमुळे खेळाडूंवर ताण येऊ शकतो. पण त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतसुद्धा त्याला विश्रांती देण्यात आली आहे, याचा कदाचित अर्थ असा होतो की २०१९च्या विश्वचषकासाठी जडेजा हा अजूनही संघात पक्का नाही.
मग जर असे असेल तर अक्षर पटेलसाठी ही एक सुवर्ण संधी असेल. तो या मालिकेत चांगली कामगिरी करून विश्वचषकाच्या संघात स्थानासाठी आपली दावेदारी मांडू शकतो.
३. के एल राहुल
कसोटी क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी करणाऱ्या राहुलला वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या कौशल्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुळातच एक सलामीवीर असलेल्या राहुलसाठी संघात सलामीला जागा नाही त्यामुळे त्याला फलंदाजीच्या मधल्या फळीतच खेळावे लागणार.
जर राहुलला भारतीय संघात आपले स्थान पक्के करायचे असेल तर त्याला मधल्या फळीत चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे.
२. उमेश यादव
श्रीलंका दौऱ्यात उमेश यादवला विश्रांती देण्यात आली होती. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध मात्र त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. उमेशने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे पण त्याच्याकडून वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या प्रतिभेला साजेशी कामगिरी झालेली नाही.
जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोन वेगवान गोलंदाज म्हणून संघात नक्की आहेत तर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शमी, भुवनेश्वर कुमार आणि यादवमध्ये संघर्ष आहे.
१. महंमद शमी
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन मालिकेत भारताने २ बदल केले आहेत आणि ते दोन्ही बदल गोलंदाजीमध्ये करण्यात आले होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शमीला संधी देण्यात आली आहे.
भारताकडे मागील पाच वर्षातील हा सर्वात चांगला गोलंदाजी संघ आहे. भूवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, महंमद शामी, आणि उमेश यादव यांच्यातून भारताचे ३ वेगवान गोलंदाज निवडण्यात येतील.
ही मालिका भारतासाठी खूप महत्वाची असणार आहे, या मालिकेत भारत विश्वचषक २०१९ साठीचा कोर संघ बनवण्यास सुरुवात करणार आहे.