सेन्चुरियन। भारताने आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध दुसऱ्या कसोटीत १३५ धावांनी पराभव स्वीकारला. या पराभवामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिकाही गमावली आहे.
या पराभवामुळे भारतीय संघावर तीन वर्षानंतर कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. याबरोबरच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच मालिकेत पराभव स्वीकारला आहे.
भारताची मजबूत समजली जाणारी फलंदाजी या सामन्यात कोलमडली. त्यामुळे भारताला या पराभवाला सामोरे जावे लागले. फलंदाजांच्या खराब कामगिरी बरोबरच आजच्या पराभवाला अनेक कारणे आहेत.
या पाच कारणांमुळे झाला भारताचा पराभव:
५. हार्दिक पंड्या धावबाद : भारतीय संघात अष्टपैलू म्हणून असलेला हार्दिक पांड्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खास काही करता आले नाही. तो पहिल्या डावात त्याच्या निष्काळजीमुळे धावबाद झाला.
तो ज्यावेळी धावबाद झाला त्यावेळी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. पण त्याला बाकी फलंदाजांकडून हवी ती साथ मिळत नव्हती अशा वेळी पंड्या कडून सर्वांना अपेक्षा होती. परंतु पंड्याने धाव घेताना आपले पाय किंवा बॅट जमिनीवर असतील याची काळजी घेतली नाही.
४. पुजारा झाला दोनदा धावबाद: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा दोन्ही डावात धावबाद झाला. एकाच कसोटीमध्ये दोन्ही डावात धावबाद होणारा पुजारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
पुजारा पहिल्या डावात शून्य धावेवर बाद झाला होता तर दुसऱ्या डावात त्याने १९ धावा केल्या. त्याच्या या खराब कामगिरीचाही भारताला या सामन्यात फटका बसला.
३. अजिंक्य रहाणे संघाबाहेर: भारतीय संघाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेला ११ जणांच्या संघात स्थान देण्यात आले नाही. त्याच्या ऐवजी रोहित शर्माला स्थान देण्यात आले होते. परंतु रोहीतनेही त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले नाही.
रहाणेची सरासरी भारताबाहेर चांगली राहिली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळेल असेच सर्वांचे मत होते, परंतु रहाणेला दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सामन्यात संघाच्या बाहेर बसावे लागले.
२. भारतीय क्षेत्ररक्षकांनी सोडले झेल: क्षेत्ररक्षण करतानाही भारतीय संघाकडून झेल घेण्याच्या संधी दवडण्यात आल्या. यात पार्थिव पटेल, मुरली विजय यांनी झेल सोडले. विजयने पहिल्या डावात तर पार्थिवने दुसऱ्या डावात डीन एल्गारचा झेल सोडला.
दुसऱ्या डावात जीवदानानंतर एल्गारने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. झेल घेण्याच्या या संधी दवडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येचा मात्र भर पडली.
१. भारतीय फलंदाजांची हाराकिरी: भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यात चांगली कामगिरी बजावली होती. परंतु त्यांच्या चांगल्या कामगिरीवर फलंदाजांनी मात्र पाणी फेरले.
आज पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीचे शतक सोडले तर एकही फलंदाजाला विशेष काही करता आले नव्हते. तर दुसऱ्या डावात भारताच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकाही करता आलेले नाही. रोहित शर्माने केलेल्या ४७ धावा या दुसऱ्या डावातील भारताकडून केलेली सर्वाधिक धावसंख्या ठरली.
या सामन्यात पहिल्या डावात भारताच्या ४ फलंदाजांना तर दुसऱ्या डावात तब्बल ७ फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आलेली नाही.