प्रो कबड्डीमध्ये काल दिनांक २४ ऑक्टोबर रोजी तिसरा एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात पटणा पायरेट्सने पुणेरी पलटणला ४२-३२ असे हरवले. या सामन्यात ३५ मिनिटे पुणेरी संघाचा दबदबा होता. शेवटच्या ५ मिनिटात सामना त्यांच्या हातातून निसटला. हा सामना गमावल्याने पुणेरी पलटणचे अंतिम फेरीपर्यंत जाण्याचे स्वप्न भंगले आणि या स्पर्धेतून त्यांना अपला गाशा गुंडाळावा लागला.
पुणेरी पलटण संघाच्या पराभवाची ५ मुख्य कारणे-
#१ डिफेन्स मधील खराब कामगिरी-
पुणेरी पलटण संघाची खरी ताकद त्यांचे डिफेंडर्स आहेत. परंतु या सामन्यात पलटणच्या डिफेन्सने खराब कामगिरी केली. पुणेरी पलटणच्या डिफेन्सने ११ गुण मिळवले ते पायरेट्स डिफेन्समधील गुणांपेक्षा २ गुण जास्त आहेत. परंतु या संघाने दुसऱ्या सत्रात डिफेन्समध्ये खूप कमी गुण मिळवले आणि शेवटच्या ५ मिनिटात प्रदीप नरवालला बाद करण्यात या डिफेन्सला अपयश आले. त्यामुळे पुणेरी संघावर सामना गमावण्याची वेळ आली.
#२ प्रदीप नरवालाची शेवटच्या पाच मिनिटातील ४ गुंणाची रेड-
दुसऱ्या सत्रात १३व्या मिनिटापर्यंत पुणेरी पलटण संघाने २९-२२ अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर राजेश मंडल याला सुपर टॅकल करण्यात आले. त्यानंतर सामन्यात ५ मिनिटे शिल्लक राहिली असताना प्रदीप नरवाल याने रेडींगमध्ये पुणेरी संघाचे चार खेळाडू बाद केले. प्रदीपने पुणेरी पलटण संघाची आघाडी २९-२८ अशी कमी केली. या रेडनंतरच्या मिनिटात पुणेरी पलटण संघ ऑल-आऊट झाला. आघाडी पायरेट्सने मिळवली. सामना संपण्यापूर्वी पुन्हा पुणेरी संघाला सर्व बाद करत पाटणा संघाने पुणेरी संघाला सामन्यात परतू दिले नाही.
#३प्रदीप नरवाल याची उत्तम कामगिरी-
प्रो कबड्डीमधील सर्वात मोठा विक्रमवीर, डुबकी किंग प्रदीप नरवाल याने पुणेरी पलटण विरुद्धच्या सामन्यात रेडींगमध्ये १९ गुण मिळवले. मागील सामन्यात त्याने हरयाणा स्टीलर्स विरुद्ध ३४ गुण मिळवत विक्रम केला होता. प्रदीपला रोखण्यासाठी पुणेरी पलटणने कोणतीही रणनीती आखली नाही किंवा ते आखलेली रणनीती मैदानात उतरवू शकले नाहीत. परिणामी प्रदीपने रेडींगमधील सर्व सूत्रे आपल्या हाती घेत पाटणा पायरेट्स संघाला विजय मिळवून दिला.
#४रेडींगमध्ये गुण मिळवण्यात आलेले अपयश-
पुणेरी पलटण संघ हा डिफेन्ससाठी ओळखला जातो, हे जरी सत्य असले तरी या संघातील रेडर रेडींग गुण मिळवून विरोधी संघावर दडपण आणण्यात ते कमी पडले. पुणेरी पलटणने रेडींगमध्ये १५ गुण मिळवले तर पायरेट्सने २३ रेडींग गुण मिळवले. येथेच ते कमी पडले. पुणेरी पलटण संघाला या मोसमात रेडींगमध्ये जास्त गुण मिळवता आलेले नाहीत. तगड्या डिफेन्ससमोर पलटणने नेहमीच नांग्या टाकल्या आहेत. याची प्रचिती गुजरात विरुद्धच्या तिन्ही सामन्यतः बघायला मिळाली, हरयाणा स्टीलर्स विरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाली आणि काल पटणा पायरेट्स विरुद्धच्या सामन्यात देखील पाहायला मिळाली.
#५ दीपक निवास हुड्डा याला कर्णधार म्हणून आलेले अपयश-
२३ वर्षीय हुड्डा याला प्रो कबड्डीच्या सर्व मोसमाचा अनुभव आहे. या मोसमात त्याला प्रथमता पुणेरी संघाची धुरा सांभाळण्याची जबादारी मिळाली. दीपक याला संघातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरण्यात नेहमी अपयश आले आहे. त्याची स्वतःची कामगिरी मोठ्या संघाविरुद्ध कमालीची खराब झाली आहे. त्यामुळे तो पुढे होऊन सर्वांना प्रेरित करू शकला नाही. कालच्या सामन्यात त्याने रेडींगमध्ये ८ गुण जरी मिळवले असले तरी संघातील इतर रेडर्स सोबत ताळमेळ बसवून संघाला पुढे घेऊन जाण्याची कला त्याच्यात नाही. पुणेरी पलटण संघाने कर्णधार म्हणून अन्य अनुभवी खेळाडूवर विश्वास दाखवायला हवा होता. उदा. धर्मराज चेरलाथन, संदीप नरवाल.