वडील जर एखाद्या क्षेत्रात यशस्वी झाले, तर मुलगाही त्यांना पाहून त्याच क्षेत्रात करिअर करण्याचा प्रयत्न करतो. हे चित्रपट, क्रीडा आणि इतर सर्व व्यवसायांमध्ये पाहण्यात आलंय. अनेक मुलं त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त नाव कमावतात, तर अनेक जण अपयशी ठरतात. असे अनेक महान क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांच्या मुलाची कारकीर्द अवघ्या काही सामन्यांमध्ये संपली. अनेकांना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधीही मिळाली नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 दिग्गज क्रिकेटपटूंच्या मुलांबद्दल सांगणार आहोत.
रोहन गावस्कर – सुनील गावस्कर यांना कोणता क्रिकेट चाहता ओळखत नाही? कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा ते पहिले फलंदाज होते. निवृत्तीच्या वेळी त्यांनी कसोटीत सर्वाधिक 34 शतकं झळकावली होती. त्यांचा मुलगा रोहन गावस्कर यालाही भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. मात्र 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला 19 च्या सरासरीनं केवळ 151 धावा करता आल्या. रोहनचा स्ट्राईक रेट 64.52 होता.
बाजिद खान – बाजिद खाननं पाकिस्तानसाठी एक कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्याच्या 32 आणि 131 धावा आहेत. त्याचे वडील माजिद खान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठं नाव आहे. ते ‘मॅजेस्टिक खान’ म्हणून ओळखले जात. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 27 हजारांहून अधिक धावा करण्याव्यतिरिक्त, त्यांनी पाकिस्तानकडून कसोटीत 39 च्या सरासरीनं 3931 धावा केल्या आहेत.
रिचर्ड हटन – रिचर्ड हटनचे वडील लिओनार्ड हटन हे क्रिकेटमधील मोठं नाव आहे. 79 कसोटीत त्यांनी 57 च्या सरासरीनं धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर तब्बल 129 शतकं आणि 40140 धावा आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून रिचर्डनंही क्रिकेटमध्ये हात आजमावला, पण तो सपशेल अपयशी ठरला. त्याच्या नावावर 5 कसोटीत 219 धावा आहेत.
माली रिचर्ड्स – क्रिकेटमधील बेधडक फलंदाजांचा विचार केला, तर सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं नाव पहिल्या क्रमांकावर येतं. गोलंदाजांना त्यांच्याविरुद्ध गोलंदाजीची भीती वाटायची. व्हिव्ह रिचर्ड्स यांचा मुलगा माली रिचर्ड्सनंही क्रिकेटमध्ये नशीब आजमावलं. त्याच्या नावावर 18 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 376 धावा, लिस्ट ‘ए’ च्या एका सामन्यात 36 धावा आणि एका टी20 मध्ये 5 धावा आहेत. याशिवाय त्यानं 16 विकेट्सही घेतल्या. मालीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही.
ख्रिस काउड्री – भारतात जन्मलेला इंग्लिश क्रिकेटर कॉलिन काउड्रीनं कसोटीत 44च्या सरासरीनं 7624 धावा केल्या. त्याच्या नावावर 22 शतकं आहेत. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 42 हजारांहून अधिक धावा केल्या. मात्र त्याचा मुलगा ख्रिस काउड्री आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला. त्याला 6 कसोटीत संधी मिळाली आणि तो 14 च्या सरासरीने केवळ 101 धावाच करू शकला.
हेही वाचा –
क्रिकेटमध्ये LBW नियम कधी सुरू झाला; बाद होणारा पहिला फलंदाज कोण?
जागतिक क्रिकेटचा नवा ‘सिक्सर किंग’! ख्रिस गेलचा 9 वर्ष जुना विक्रम उध्वस्त
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात जो रुटची ऐतिहासिक कामगिरी