सन २०२० अनेक घटनांमुळे लक्षात राहिल. या वर्षात अनेक दुर्मिळ घटना घडलेल्या पहायला मिळाल्या. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले. यामुळे अनेक क्षेत्रांप्रमाणेच क्वचितच बंद क्रीडा क्षेत्रही काही महिने चक्क ठप्प पडले होते. पण अखेर हळूहळू क्रीडा क्षेत्र पूर्वपदावर आणण्याची सर्वच देशातून तयारी सुरु आहे. असे असले तरी याच वर्षात क्रीडा क्षेत्राला धक्का बसेल अशा घटनाही घडल्या. काही दिग्गज खेळाडूंचे या वर्षात निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण क्रीडा जगतातून हळहळ व्यक्त झाली.
या लेखातून आपण त्या ५ खेळाडूंवर नजर टाकू ज्यांनी २०२० या वर्षात जगाचा निरोप घेतला.
५. चुन्नी गोस्वामी –
भारताचे माजी महान फूटबाॅलपटू व क्रिकेटपटू चुन्नी गोस्वामी(Chuni Goswami) यांचे ३० एप्रिल रोजी निधन झाले. कार्डियाक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) त्यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले. त्यांनी बंगालकडून ४७ तर भारताकडून ५० फूटबाॅलचे सामने खेळले होते. ते भारताकडून १९५६ ते १९६४ या काळात फूटबाॅल खेळले. ते क्लब फूटबाॅल १९५४ ते १९६८ या काळात मोहन बगान क्लबकडून खेळले.
चुन्नी गोस्वामी यांनी १९६२साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय फूटबाॅल संघाचे नेतृत्त्वही केले होते. या स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकले होते. १९६४ साली त्यांनी आशिया कपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवुन दिले होते. १९६३मध्ये त्यांना क्रीडा जगतात मानाचा समजला जाणारा अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. त्यांना १९८३मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
एवढेच नाही तर त्यांनी फूटबाॅलमधून निवृत्ती घेतल्यावर क्रिकेटकडे मोर्चा वळवला होता. त्यांनी वयाच्या २७व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय फूटबाॅलला अलविदा केला होता. त्यांनी १९६२ ते १९७३ या काळात बंगाल संघाकडून ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले. यात त्यांनी २८.४२च्या सरासरीने १५९२ धावा तर २४.०८च्या सरासरीने ४७ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यांनी बंगाल संघाला आपल्या नेतृत्त्वाखाली रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले होते. १९७१-७२ हंगामात त्यांच्याच नेतृत्त्वाखाली बंगाल संघाचा ब्रेबाॅर्न स्टेडियमवर रणजी फायनलमध्ये पराभव झाला होता.
४. डीन जोन्स –
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक डीन जोन्स यांचे २४ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगताला धक्का बसला होता. ते ५९ वर्षांचें होते. तसेच तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या हंगामासाठी ते स्टार स्पोर्ट्सच्या समालोचन टीमशी संबंधित होते आणि ते त्यासाठी मुंबईत होते.
या दिग्गज फलंदाजाचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्यासोबत हॉटेलमध्ये त्यांच्याच देशाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली देखील होता. जेव्हा जोन्स यांना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा ब्रेट लीने सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. जोन्सला ब्रेकफास्टनंतर हॉटेल लॉबीमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता.
डिनो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने ५२ कसोटी आणि १६४ वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते.कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या २१६ होती आणि वनडेत १४५ ही त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४६.५५ च्या सरासरीने ३६६१ धावा केल्या, ज्यामध्ये ११ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे सामन्यात जोन्स यांनी ४४.६१ च्या सरासरीने ६०६८ धावा केल्या, ज्यामध्ये ७ शतके आणि ४६ अर्धशतकांचा समावेश आहे.
जोन्स यांनी २४५ प्रथम श्रेणी सामन्यांत १९१८८ धावा केल्या. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दोन दुहेरी शतकेही ठोकली होती, १९८६ मध्ये त्यांनी चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथे भारताविरुद्ध २१० धावांची खेळी केली होती.
३. चेतन चौहान –
भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या मूत्रपिंडाच्या संसर्गामध्ये वाढ झाली. अखेर त्यांनी गुरगावच्या मेदांता रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
चौहान यांनी भारताकडून १९६९ ते १९७८ दरम्यान ४० कसोटी सामने खेळले. यात त्यांनी ३१.५७ च्या सरासरीने २०८४ धावा केल्या. यात त्यांच्या १६ अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच त्यांनी ७ वनडे सामने खेळले असून यात १५३ धावा केल्या आहेत.
सन १९७० च्या दशकात त्यांची आणि सुनील गावसकरांची एक यशस्वी सलामी जोडी म्हणून ओळखली जात होती. त्यांनी १० शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच भागीदारीत ३००० धावा केल्या आहेत. १९७९ मध्ये ओव्हल येथे या दोघांनी केलेली भागीदारी संस्मरणीय मानली जाते. या जोडीने २१३ धावांची भागीदारी रचली होती.
चेतन यांनी १७९ प्रथम श्रेणी सामन्यांत ४०.२२ च्या सरासरीने १११४३ धावा केल्या. ह्यामध्ये त्यांनी २१ शतके आणि ५९ अर्धशतके झळकावली आहेत. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध १९८१ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
निवृत्तीनंतर काही काळ ते क्रिकेट समालोचक म्हणून काम केले. यासोबतच दिल्ली राज्य क्रिकेट संघटनेच्या विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. तसेच ते राजकिय क्षेत्राकडेसुद्धा वळाले. ते उत्तरप्रदेशचे कॅबिनेट मंत्री होते.
२. दिएगो मॅराडोना –
अर्जेंटीनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे २५ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या निधनानंतर केवळ फुटबॉल जगतातूनच नव्हे तर संपूर्ण क्रीडाविश्वातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मॅराडोना यांचा १९८६च्या विश्वचषकाचे विजेतेपद अर्जंटीनाला मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यावेळी ते अर्जेंटीना संघाचे कर्णधार देखील होते. तसेच १९८६ ला त्यांना मानाचा गोल्डन बॉल आणि सिल्हर शुज मिळाला होता. त्यांनी क्लब स्थरावर बार्सोलिना ज्युनियर, नापोली आणि बार्सेलिना या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
मॅराडोना यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ३१२ गोल केले. त्याचबरोबर त्यांनी विश्वचषकातील २१ सामन्यात ८ गोल आणि ८ असिस्ट केले आहेत.
१. कोबी ब्रायंट –
क्रीडा जगताला सर्वात मोठा धक्का बसला तो स्टार बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटच्या अपघाती निधनाने. २६ जानेवारी रोजी कोबी ब्रायंट आणि त्याची १३ वर्षीय मुलगी गियाना यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह या अपघातात एकूण ९ जणांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे दिग्गज कोबी ब्रायंटच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण क्रीडा जगतातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
४१ वर्षीय कोबी ब्रायंट नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमध्ये(एनबीए) लॉस एंजलिस लेकर्सकडून खेळायचा. त्याने २० वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्यानेे एनबीएमध्ये खेळताना ५ वेळा चॅम्पियनशिपही जिंकल्या होत्या. तसेच ऑलिंपिकमध्ये त्याने अमेरिकेकडून २ सुवर्णपदकेही जिंकली होती. त्याने २०१६ ला निवृत्ती घेतली होती.
आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत एनबीएमधील अनेक पुरस्कार त्याने आपल्या नावे केले. एनबीए चॅम्पियनशिप, एनबीए ऑल स्टार, एनबीए सर्वात्कृष्ट खेळाडू पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्याने मिळवले.
त्याच्या निधनानंतर तो परिधान करत असलेला ८ आणि २४ क्रमांकाचा जर्सी क्रमांकही निवृत्त करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
युवराज सिंग नाही, तर ‘या’ भारतीय दिग्गजाने ठोकल्यात एका षटकात सर्वाधिक धावा
‘अजिंक्य रहाणे गोलंदाजांचा कर्णधार’, संघ सहकाऱ्याने उधळली स्तुतिसुमने
डेव्हिड वॉर्नर बनलाय डॉन, बघा संपूर्ण व्हिडिओ