भारतीय क्रिकेट संघाचा तीनही प्रकारातील कर्णधार विराट कोहली हा दिवसेंदिवस नवनवीन विक्रम करत चालला आहे. एक खेळाडू आणि एका संघाचा कर्णधार अशा दोंन्ही पातळ्यांवर कोहलीने जबदस्त कामगिरी केली आहे.
तरीही विराट कोहलीची चर्चा ही कायमच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि न्युझीलँडचा कर्णधार केन विलियम्सन यांच्याशी होते. या तीनही खेळाडूंमध्ये जबदस्त प्रतिभा असली तरी ते क्रिकेटच्या तीनही प्रकारात उत्तम कामगिरी करतात असे नाही. त्यात मात्र कोहली या क्रिकेटपटूंपेक्षा बराच पुढे आहे.
सध्या कोहलीच्या नावावर क्रिकेटच्या तीनही प्रकारात ५० किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी आहे. त्यात कसोटीमध्ये ५०.०३ , वनडेमध्ये ५४.६८ आणि टी२०मध्ये ५३.०० अशी त्याची सरासरी आहे.
स्मिथ, विलियम्सन, रूट यापैकी केवळ रूटची तीनही प्रकारात सरासरी ४०च्या पुढे आहे. कसोटीमध्ये ५३ , वनडेमध्ये ४९ आणि टी२०मध्ये ४० अशी त्याची सरासरी आहे तर स्मिथची सरासरी ही कसोटीमध्ये जबदस्त असली तरी टी२० प्रकारात अतिशय सुमार आहे. त्याची सरासरी ही कसोटीमध्ये ६१, वनडेमध्ये ४४ आणि टी२०मध्ये २१ आहे.
न्युझीलँडचा कर्णधार केन विलियम्सनची सरासरी ही कसोटीमध्ये ५०, वनडेमध्ये ४६ आणि टी२०मध्ये ३६ आहे. जर सरासरीच्या विचार केला तर या क्रिकेटपटूंपेक्षा विराट बराच पुढे असलेला दिसतो.