पुणे। हर हॉकी अकॅडमी सोनीपत आणि सेल हॉकी अकॅडमी, ओडिशा यांच्यात एसएनबीपी आयोजित पाचव्या १६ वर्षांखालील अखिल भारतीय हॉकी स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहे.
रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत हर अकॅडमीने यजमान एसएनबीपी संघाचा प्रतिकार नियोजित वेळेतील २-२ अशा बरोबरीनंतर पेनल्टीशूट आऊटमध्ये २-० असा मोडून काढला. एसएनबीपी संघाला फहाद खानने आठव्याच मिनिटाला गोल करून आघाडीवर नेले. वेगवान सुरवात करताना त्यांना सुरवातीलाच पेनल्टी स्ट्रोक मिळाला. तो फहादने अचूक साधला. एसएनबीपीच्या या सुरवातीच्या गोलने हर अकॅडमी संघाने आपल्या खेळात अचानक बदल केला. त्यांनी आक्रमक खेळ करत एसएनबीपी संघावर दडपण आणण्यास सुरवात केली. त्याचे फळ त्यांना दोनच मिनिटांत मिळाले. दहाव्या मिनिटाला साहिल रुहाल याने गोल करून १-१ अशी बरोबरी राखली. एका गोलने हर अकॅडमीच्या खेळाडूंचा आत्मविश्वास इतका उंचावला की त्यांनी पुढच्याच मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. त्यांच्या नितीन परमारने ११व्या मिनिटाला हा गोल केला.
एका गोलच्या पिछाडीनंतर एसएनबीपी संगाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात आपला खेळ उंचावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना गोल करण्यात अपयश आले. सामन्याच्या अखेरच्या चौथ्या सत्रात अखेर एसएनबीपीला गोल करण्याची संधी मिळाली. आकाश पालच्या रिव्हर्स फ्लिकने अचूक काम केले आणि सोनीपत संघाच्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाळीत गेला. शूट आऊटमध्ए सोनीपत संघाच्या खेळाडूंना गोलरक्षकापेक्षा गोलपोस्टच्या फ्रेमने वाचवले. एसएनबीपी संघाच्या तीन खेळाडूंचे शॉट हे फ्रेमला लागून बाहेर गेले. तुलनेत सोनीपतकडून रामन आणि रविंदर खासा यांनी गोल करून संघाला अंतिम फेरीत नेले.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेल ऍकॅडमी संघाने एका अमोल(ज्युनि.), रितिक कुजुर आणि राबी बाडा यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर रिजनल डेव्हलपमेंट सेंटर, झारखंड संघाचा ६-१ असा पराभव केला. पराभूत संघाकडून गुरिया फिलिप याने २६व्या मिनिटाला एकमात्र गोल केला.
निकाल – उपांत्य फेरी
हर हॉकी अकॅडमी,सोनीपत २ (२) (साहिल रुहाल १०वे, नितीन परमान ११वे, रामन, रविंदर खासा) वि.वि.एसएनबीपी अकॅडमी पुणे २ (०) (फहाद खान ८वे, आकाश पाल ४९वे मिनिट)
सेल हॉकी अकॅडमी, ओडिशा ६ (एक्का अमोल ज्युनि. ३रे, २७वे, रितीक कुजुर ७वे, ८वे, राबी बाडा ४०, ४६वे मिनिट) वि.वि.रिजनल डेव्हलपमेंट सेंटर, झारखंड १ (गुरिया फिलिप २६वे मिनिट)
आजचे सामने –
तिसऱ्या क्रमांकासाठी – एसएनबीपी, पुणे वि. रिजनल डेव्हलमेंट सेंटर,झारखंड (दुपारी १ वा.)
अंतिम सामना – हर हॉकी अकॅडमी, सोनीपत वि.वि. सेल हॉकी अकॅडमी, ओडिशा ० (दुपारी ३ वा.)
केंद्र – शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी