गेल्या काही वर्षापासून फिटनेस हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळे आता बरेच भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या खेळाबरोबरच फिटनेसवरही लक्ष केंद्रीत करताना दिसतात. काही वर्षांपासून यो-यो चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या खेळाडूंनाच भारतीय संघात स्थान दिले जाते. नुकतेच काहीदिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २ किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानुसार काही क्रिकेटपटूंची ही चाचणी पार पडली असून ६ खेळाडू यात अनुत्तीर्ण झाले आहेत.
ही चाचणी पूर्ण न करु शकलेल्या ६ क्रिकेटपटूंमध्ये संजू सॅमसन, इशान किशन, नितीश राणा, राहुल तेवतिया, सिद्धार्थ कौल आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे. खरंतर अगामी काळात भारतीय संघाला काही महत्त्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. याच इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिका, इंग्लंड दौरा, टी२० विश्वचषक अशा काही मालिकांचा समावेश आहे. त्याआधी या फिटनेस टेस्ट घेणे सुरु आहे.
याबाबतीत एका सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले, ‘हा फिटनेस चाचणीचा नवा प्रकार आहे. त्यामुळे सर्वांना काहीवेळानंतर पुन्हा एकदा ही चाचणी देण्याची संधी मिळेल. जर ते पुन्हा एकदा ही चाचणी उत्तीर्ण होण्यात अपयशी ठरले तर त्यांचे अगामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेत खेळणे कठीण होऊन बसेल.’
बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये यो-यो चाचणी आणि २ किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात आली होती. यात साधारण २० क्रिकेटपटूंची चाचणी झाली.
सुत्राने सांगितले की ‘२ किलोमीटर धावण्याच्या चाचणीत फलंदाज, यष्टीरक्षक आणि फिरकीपटूला ८ मिनिट ३० सेंकदात २ किलोमीटर अंतर पार करायचे असते. तर वेगवान गोलंदाजाला ८ मिनिट १५ सेंकदात ही चाचणी उत्तीर्ण करावी लागते. ६ खेळाडू ही चाचणी उत्तीर्ण करण्यात अपयशी ठरले. काही खेळाडूंनी मुश्किलीने चाचणी पूर्ण केली. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांना या चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या मर्यादेबाबत विश्वास आहे.’
यापूर्वीही अनेकदा असे झाले आहे की यो-यो चाचणीत अपयशी ठरलेल्या क्रिकेटपटूंना भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. याआधी संजू सॅमसन, मोहम्मद शमी, अंबाती रायडू, युवराज सिंग यांसारख्या खेळाडूंनी याचा अनुभव घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भुवनेश्वर कुमार आता सांभाळणार कर्णधारपद, ‘या’ संघाची घोषणा
चेन्नईच्या खेळपट्टीवर होऊ शकतो काळया मातीचा वापर; संघांना होणार ‘हा’ फायदा
पोरांची आयपीएल! तीन दिग्गज माजी क्रिकेटपटूंची पोरं उतरणार आयपीएल लिलावात, पाहा कोण आहेत ते चेहरे