आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट हे कायमचं फलंदाजांचा क्रिकेट प्रकार म्हणून ओळखला जातो. यात फलंदाजांच्या बाजूने असलेल्या नियमामुळे मोठमोठ्या धावसंख्या उभारलेल्या दिसतात. गोलंदाजांसाठी हा प्रकार तसा फारच मारक समजला जातो. त्यामुळे विक्रमांचे इमलेही खास उभारले जातात.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १०८४ सामने खेळले आहेत. मोठ्या धावसंख्येचा विचार केला तर आजपर्यंत ६ वेळा २५० धावांचा टप्पा संघांनी पार केला आहे. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ११७ वेळा २०० किंवा त्यापेक्षा धावा झाल्यात.
भारतीय संघाने १७ वेळा २०० धावांचा आकडा पार केला आहे. श्रीलंकेने २००७ मध्ये केनियाविरुद्ध पहिल्यांदा २५० धावा पार करण्याचा विक्रम बनवला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनेच २५० धावांचा टप्पा पार केला आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सर्वोच्च धवसंख्येचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या (२४५/५) नावावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम संयुक्तपणे अफगाणिस्तान आणि झेक प्रजासत्ताकच्या नावावर आहे.
आज या लेखात आपण त्या ६ संघांचे सामने पाहणार आहोत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २५० धावांचा टप्पा पार केला होता.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २५० धावांचा टप्पा पार करणारे संघ- 6 teams with the most 250+ totals in T20 Internationals
६. स्कॉटलंड (२५२/३, विरुद्ध- नेदरलँड, २०१९)
आयर्लंडमध्ये आयोजित केलेल्या तिरंगी मालिकेतील १६ सप्टेंबर २०१९ ला झालेल्या स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड सामन्यात स्कॉटलंडने २५० धावांचा टप्पा पार केला होता. डब्लिनमध्ये खेळण्यात आलेल्या या सामन्यात स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना जॉर्ज मुन्सेच्या नाबाद १२७ आणि काईल कोएट्झरच्या ८९ धावांच्या मदतीने ३ बाद २५२ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल पीटर सीलारच्या धडाकेबाज ९६ धावांच्या खेळीनंतरही नेदरलँड संघाला केवळ ७ बाद १९४ धावांपर्यंत मजल मारता आली.
५. श्रीलंका (२६०/६, विरुध्द- केनिया, २००७)
श्रीलंकेने २००७ टी२० विश्वचषकात पहिल्यांदा २५० धावांचा टप्पा पार केला होता. केनियाविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये १४ सप्टेंबर २००७ रोजी हा सामना झाला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना सनथ जयसूर्या (४४ चेंडूत ८८ धावा) आणि महेला जयवर्धनेच्या (२७चेंडूत ६५ धावा) धडाकेबाज खेळीच्या जोरावर ६ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल केनियाचा डाव सर्वबाद ८८ धावांत आटोपला. श्रीलंकेने विक्रमी १७२ धावांनी विजय मिळवला.
४. भारत (२६०/५, विरुद्ध- श्रीलंका, २०१७)
इंदोरमध्ये २२ डिसेंबर २०१७ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा टी२० लढतीत २५० धावांचा आकडा पार केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) ४३ चेंडूतील ११८ धावा आणि केएल राहुलच्या (KL Rahul) ४९ चेंडूतील ८९ धावांच्या जोरावर ५ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. रोहितने त्या सामन्यात ३५ चेंडूत शतक साजरे केले आणि सर्वात जलद शतकाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ १७२ धावांत गारद झाला. अशाप्रकारे भारताने ८८ धावांनी विजय मिळवला होता.
३. ऑस्ट्रेलिया (२६३/३, विरुद्ध- श्रीलंका, २०१६)
ऑस्ट्रेलियाने पल्लेकल येथे ६ सप्टेंबर २०१६ रोजी श्रीलंकेविरुद्ध २५० धावांचा टप्पा पार केला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलच्या ६५ चेंडूतील नाबाद १४५ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ३ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारली. त्यावेळी टी२० क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या होती. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकन संघाला केवळ ९ बाद १७८ धावसंख्या उभारू शकली.
२. झेक प्रजासत्ताक (२७८/४, विरुद्ध- तुर्की, २०१९)
टी२० क्रिकेटमध्ये नवीन दाखल झालेल्या झेक प्रजासत्ताकने ३० ऑगस्ट २०१९ रोजी इल्फोव काउंटी, रोमानिया येथे तुर्कीविरुद्ध ४ बाद २७८ धावसंख्या उभारली होती. तसेच, अफगाणिस्तानच्या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली होती. झेक प्रजासत्ताककडून सुदेश विक्रमसेकराने ताबडतोड फलंदाजी करताना ३६ चेंडूत १०४ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरादाखल तुर्कीचा संघ फक्त २१ धावांत सर्वबाद झाला. झेक प्रजासत्ताकने विक्रमी २५७ धावांनी विजय मिळवला.
१. अफगाणिस्तान (२७८/३, विरुद्ध- आर्यलंड, २०१९)
अफगाणिस्तानने आर्यलंड विरुद्ध २३ फेब्रुवारी २०१९ रोजी डेहराडूनमध्ये ३ बाद २७८ धावांचा डोंगर रचून विश्वविक्रम बनवला होता. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना हजरतुल्लाह जजईने ६२ चेंडूत १६२ धावांची वादळी खेळी केली. उस्मान घनीसोबत विक्रमी २३६ धावांची सलामी दिली. प्रत्युत्तरादाखल आर्यलंड संघाला केवळ ६ बाद १९४ धावांपर्यंतच मजल मारू शकला.