आज(7 जानेवारी) संध्याकाळी 63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मानाच्या चांदीच्या गदेसाठी लढत रंगणार आहे. ही लढत नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळके या दोन कुस्तीगिरांमध्ये होणार आहे.
हर्षवर्धनने गादी विभागातील अंतिम फेरीत माजी विजेत्या पुणे शहराच्या अभिजीत काटकेला 5-2 गुणांनी पराजित केले. तर शैलेशने माती विभागीतील चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडेचा पराभव केला आहे.
आता हर्षवर्धन आणि शैलेश या दोन पहिलवानांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज लढत होईल.
विशेष म्हणजे हे दोघेही अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचे शिष्य आहेत. त्यामुळे आज यांच्यातील कोणीही जिंकले तरी 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर काका पवार यांच्या तालमीत महाराष्ट्र केसरीची गदा जाणार आहे.
63 व्या महाराष्ट्र केसरीच्या किताबी लढतीबद्दल सर्वकाही –
-कधी होणार 63 व्या महाराष्ट्र केसरीची किताबी लढत?
आज 7 जानेवारीला 63 व्या महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी लढत होईल.
-किती वाजता होणार आहे 63 व्या महाराष्ट्र केसरीची किताबी लढत?
आज संध्याकाळी 5 वाजता 63 व्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी सामना सुरु होईल.
-कोणामध्ये रंगणार 63 व्या महाराष्ट्र केसरीची किताबी लढत?
नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळके या दोन मल्लांमध्ये 63 व्या महाराष्ट्र केसरीची किताबी लढत रंगेल
-कुठे होणार आहे 63 व्या महाराष्ट्र केसरीची किताबी लढत?
पुण्यातील म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 63 व्या महाराष्ट्र केसरीची किताबी लढत होईल.
-कोणत्या चॅनेलवर पाहता येईल 63 व्या महाराष्ट्र केसरी किताबी लढत?
63 व्या महाराष्ट्र केसरीची किताबी लढत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या युट्युब चॅनेलला लाईव्ह स्ट्रीम आहे.
तसेच प्रत्यक्ष बालेवाडी स्टेडियमवर उपस्थित राहणाऱ्या कुस्तीशैकिनांसाठी ही अंतिम लढत विनामूल्य खुली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना अंतिम लढतीचा आनंद घेता यावा यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
-प्रत्यक्ष सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या वाहनांची काय सोय आहे?
वाहनांची व्यवस्था हाय वे वरील हाॅलिडे इन वरील मैदानावर करण्यात आली आहे.