पल्लेकेल: भारताचा सलामीवीर केएल राहुलने श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना आज मोठा पराक्रम केला आहे. केएल राहुलने आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना कारकिर्दीतील ९वे कसोटी अर्धशतक केले आहे.
दुसऱ्या सत्रात मात्र हा फलंदाज ८५ धावांवर बाद झाला. याबरोबर त्याच्या नावावर एक विचित्र विक्रम जमा झाला. तो अर्थात सलग 7 डावात अर्धशतकी खेळी करताना एकही खेळीचे रूपांतर शतकात न करता येण्याचा.
यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलिया ख्रिस रॉजर्सच्या नावावर होता. रॉजर्सने सलग सात डावात अर्धशतकी खेळी केल्या होत्या. परंतु त्याला त्याचे रूपांतर एकदाही शतकात करता आले नव्हते.
केएल राहुलच्या सात सलग डावातील अर्धशतकी खेळी या 90, 51, 67, 60, 51*, 57, 85 अशा राहिल्या आहेत. त्याने नाबाद ५१ धावांची खेळी धरमशाला कसोटी येथे केली आहे. केएल राहुलच्या अर्धशतकी खेळींचा सिलसिला हा ४मार्चच्या बेंगलोर कसोटीपासून सुरु झाला आहे.