भारतीय कर्णधार आणि तिन्ही प्रकारात अफलातून फलंदाजी करणारा विराट कोहलीने आज आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९ वर्षे पूर्ण केली आहेत. विराटने आजवर एकदिवसीय कसोटी आणि टी -२०मध्ये अनेक विक्रम मोडले आहेत. पण ९ वर्ष आधी जेव्हा विराटने आपला पहिला सामना खेळला तेव्हा कोणाला याची कल्पनाही नव्हती.
विराटने जेव्हा भारतासाठी पहिला सामना खेळला तेव्हा त्याचे वय फक्त १८ होते. भारताच्या १८ वर्षाखालील संघाने विराटच्याच नेतृत्वाखाली २००८च्या मलेशियामध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये विजेतेपद पटकावले होते. तेव्हाच विराट कोहली लाईम-लाईट मध्ये येण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता तो भारतीय संघासाठी सर्वात मौल्यावान रत्न बनला.
विराटला २००८च्या १८ वर्षा खालील विश्वचषकाचे स्पर्धेच्या विजयाचे बक्षीस लगेच मिळाले, त्याला २००८च्या ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आले. त्याच्या नशिबाने त्याला त्या मालिकेत खेळायला ही मिळाले. विरेंद्र सेहवागला दुखापत झाल्यामुळे विराटला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात तो फक्त १२ धावा करू शकला पण या मालिकेत त्याने १ विजयी अर्धशतकी खेळी केली होती.
विशेष म्हणजे त्याने आपला पहिला एकदिवसीय सामना १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्धच खेळला होता आणि आता ही भारतीय संघ श्रीलंकेतच आहे आणि रविवार म्हणजे २० ऑगस्ट पासून भारत श्रीलंकेमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ज्या रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये विराटने पहिला एकदिवसीय सामना खेळला होता त्याच स्टेडियममध्ये भारत या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे.
९ वर्षापूर्वीचा विराट आणि आताचा विराट यात खूप फरक दिसत आहे. विराटने त्याच्या फलंदाजी बरोबरच त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये ही खूप बदल केले आहे. मागील वर्षांपासून एकदिवसीयमध्ये तर २०१४ पासून कसोटीमध्ये तो भारताचे नेतृत्व करत आहे. कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणूनही त्याने हे ९ वर्ष प्रत्येक क्रिकेट प्रेमींसाठी अविस्मरणीय बनवले आहेत.