नागपूर : मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या नागपूर टप्प्यातील पहिल्याच दिवशी शतकी खेळी आणि ८ विकेट्स घेऊन सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या देवांश मिश्राने बुधवारी प्रतिस्पर्धी संघाला हार मानण्यास भाग पाडले. आज झालेल्या १६ वर्षांखालील मुले गटात सेंटर पॉईंट पब्लिक स्कूल संघाच्या विजयात पुन्हा एकदा देवांश चमकला. १६ वर्षांखालील मुली गटात एकता बोबडे आणि शिवाश्री धारे यांनी आपले नाणे खणखणीत वाजवले.
मुलांचा गटात देवांशने ७ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी न्यू ॲपोस्टॉलिक इंग्लिश स्कूलचा संपूर्ण संघ ६.१ षटकांत १५ धावांत माघारी पाठवला. सेंटर पॉईंट पब्लिक स्कूल ( काटोल रोड) संघाने हे माफक लक्ष्य १ षटकात बिनबाद १८ धावा करून पार केले. सलामीवीर प्रभविराज लांबाने नाबाद १८ धावा केल्या. देवांशला सामनावीर म्हणून गौरविले.
१४ वर्षांखालील मुले गटात दिल्ली पब्लिक स्कूलच्या आकाश सिंगच्या अष्टपैलू कामगिरीने वर्चस्व गाजवले. त्याने ३ विकेट्स आणि १९ धावांचे योगदान देत संघाला श्री कॉन्व्हेंट ॲन्ड ज्युनियर कॉलेज ( मानेवाडा) संघावर ७० धावांनी विजय मिळवून दिला.
१६ वर्षांखालील मुली गटात सिद्धेश्वर विद्यालय संघाच्या एकता बोबडेनेही अष्टपैलू कामगिरी केली. एसएस इंटरनॅशनल स्कूल संघाचा डाव १८.२ षटकांत ५५ धावांवर गुंडाळून सिद्धेश्वर विद्यालय संघाने १० विकेट्स राखून विजय मिळवला. एकताने गोलंदाजीत ५ विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीत नाबाद २३ धावांचे योगदान दिले.
दुसऱ्या सामन्यात श्री राजेंद्र हायस्कूल संघाने एमकेएच संचेती पब्लिक स्कूल संघावर ६०४ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. श्री राजेंद्र हायस्कूल संघाने २ बाद ६३९ धावा केल्या. यात त्यांना ३०४ धावा या प्रतिस्पर्धी संघाने केलेल्या चुकीची पेनाल्टी म्हणून बहाल करण्यात आल्या. संस्कृती तळवेकरने नाबाद ८८ आणि शिवाश्री धारेने नाबाद ८० धावांचे योगदान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना एमकेएच संचेती पब्लिक स्कूलचा संपूर्ण संघ १०.३ षटकांत ३५ धावा करून तंबूत परतला. शिवाश्री धारेने ४९ चेंडूंत ८० धावा केल्या आणि १ विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली. तिला सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविले.
संक्षिप्त धावफलक
नागपूर
१६ वर्षांखालील मुले
सेंटर पॉईंट पब्लिक स्कूल ( काटोल रोड) १ षटकात बिनबाद १८ ( प्रभविराज लांबा १८* ) वि. वि.न्यू ॲपोस्टॉलिक इंग्लिश स्कूल ६.१ षटकांत सर्वबाद १५; सामनावीर – देवांश मिश्रा ( ७ विकेट्स)
पोदार इंटरनॅशनल स्कूल १४.२ षटकांत ४ बाद १०५ ( अनुराग दीक्षित ४५, अथर्व बाभुळगावकर १३) वि. वि. दी स्वामीनारायण स्कूल १९.३ षटकांत सर्वबाद १०४; सामनावीर – अथर्व बाभुळगावकर ( १३ धावा आणि ४ विकेट्स)
पोदार वर्ल्ड स्कूल ३२.१ षटकांत सर्वबाद १५७ ( शिवकुमार दुबे ४२, आदित्य रोहनकर ४०) वि. वि. एमकेएच संचेती पब्लिक स्कूल ४० षटकांत ९ बाद १४७; सामनावीर – आदित्य रोहनकर ( ४० धावा आणि २ विकेट्स व १ निर्धाव षटक)
१४ वर्षांखालील मुले
दिल्ली पब्लिक स्कूल ३३.१ षटकांत सर्वबाद १३४ ( पार्थ बेलगुंडकर २८, आकाश सिंग १९) वि. वि. श्री कॉन्व्हेंट ॲन्ड ज्युनियर कॉलेज ( मानेवाडा) १३.२ षटकांत सर्वबाद ६४; सामनावीर – आकाश सिंग ( १९ धावा आणि ३ विकेट्स)
दी साऊथ पब्लिक स्कूल ३७.५ षटकांत सर्वबाद २०७ ( सार्थक मगर ५५, प्रणव वडास्कर ४९) वि. वि. गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूल २३.४ षटकांत सर्वबाद ९३; सार्थक मगर ( ३४ चेंडूंत ५५ धावा आणि २ विकेट्स)
कर्वे न्यू मॉडेल पब्लिक स्कूल २४.१ षटकांत ८ बाद ८९ ( साहिल भिसे २३, अमुल गाडे १४) वि. वि. सेंट फ्रान्सिस डे सॅलेस २५.५ षटकांत सर्वबाद ८८; सामनावीर – आरुष उस्केलवार ( ४ विकेट्स)
१६ वर्षांखालील मुली
श्री राजेंद्र हायस्कूल २ बाद ६३९ ( ३०४ धावांची पेनाल्टी) ( संस्कृती तळवेकर ८८*, शिवाश्री धारे ८०) वि. वि. एमकेएच संचेती पब्लिक स्कूल १०.३ षटकांत सर्वबाद ३५; सर्वोत्तम खेळाडू – शिवाश्री धारे ( ४९ चेंडूंत ८० धावा आणि १ विकेट्स)
सिद्धेश्वर विद्यालय ४.३ षटकांत बिनबाद ५६ ( एकता बोबडे २३*, राशी चवारिया ५*) वि. वि. एसएस इंटरनॅशनल स्कूल १८.२ षटकांत सर्वबाद ५५; सर्वोत्तम खेळाडू – एकता बोबडे ( २३ धावा आणि ५ विकेट्स)