दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममधील (पूर्वीचे नाव फिरोजशाह कोटला) अनेक स्टँडला माजी खेळाडूंची नावे देण्यात आली आहेत. भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचेही सन २०१७ ला या स्टेडियमवरील एका स्टँडला नाव देण्यात आले होते. मात्र आता ते नाव हटवण्याची मागणी खुद्द बिशन सिंग यांनीच केली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. याबरोबरच त्यांच्या या मागणीमुळे दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट बोर्डाच्या (डीडीसीए) अंतर्गत वाद असल्याचेही समोर येत आहे.
बिशन सिंग यांनी डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांना पत्र लिहून स्टेडियमच्या स्टँडला दिलेले त्यांचे नाव हटवण्याची मागणी केली आहे.
बिशन सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की ‘जेव्हा फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव घाईट बदलून दिवंगत अरुण जेटली यांच्या नावावरुन ठेवण्यात आले, तेव्हा मला आशा होती की हे एका चांगल्या हेतूने केले जात आहे. पण मी किती चूकीचा होतो. आता तर अरुण जेटली यांची ६ फुट उंच पुतळा (स्टॅच्यू) उभा करण्यात येणार आहे. अरुण जेटलींचा पुतळा कोटला येथे येणार याबद्दल मला अजिबात मोह वाटत नाही.’
त्यांनी पुढे लिहिले, ‘मी अफाट सहनशीलता आणि धैर्य असलेला व्यक्ती असल्याचा मला अभिमान आहे, परंतु मला भीती वाटते की माझी सहनशीलता संपत आहे. डीडीसीएने माझ्या धैर्याची खूप परिक्षा घेतली आहे. त्यामुळे मला हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. स्टँडला दिलेले माझे नाव तात्काळ हटवण्यात यावे आणि मी डीडीसीएच्या सदस्यत्वाचाही त्याग करत आहे.’
अरुण जेटली यांचे सन २०१९ मध्ये निधन झाले. त्यानंतर फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव बदलण्यात आले होते व अरुण जेटली यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आले होते.
पुढे बिशन सिंग बेदी यांनी लिहिले आहे की ‘अरुण जेटली हे एक राजकारणी होते. त्यामुळे त्यांना क्रिकेट स्टेडियमने नाही तर संसदेने लक्षात ठेवायला हवे. ते चांगली क्रिकेट चाहते असतीलही, पण क्रिकेट प्रशासनाशी असलेले त्यांचे व्यासंग संशयास्पद होते. माझ्या या विधानाला खळबळजनक म्हणू नका तर डीडीसीएमध्ये त्यांच्या काळाचे हे वास्तविक मूल्यांकन आहे.’
सध्या डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली अरुण जेटली यांचे पुत्र आहेत. त्यांची काही महिन्यांपूर्वीच पत्रकार रजत शर्मा यांच्या जाेगवर डीडीसीएचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.
बिशन सिंग बेदी यांची कारकिर्द –
बिशन सिंग बेदी यांनी १९६१ ते १९८१ पर्यंत दिल्ली संघाचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर ६७ कसोटी आणि १० वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी २६६ विकेट्स आणि वनडेत ७ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काही काळ काम पाहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऐकावं ते नवलंच! चक्क प्रखर उन्हामुळे थांबला न्यूझीलंड-पाकिस्तान सामना; चाहत्यांनी उडवली खिल्ली
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या ४ गोष्टी
टीम इंडियासाठी वाईट बातमी! मोहम्मद शमी ‘इतक्या’ दिवसांसाठी क्रिकेटपासून असणार दूर