भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज (२९ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३८९ धावा करत भारतासमोर विजयासाठी ३९० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, यादरम्यान भारतीय गोलंदाजांच्या नावे एक नकोसा विक्रम जमा झाला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी ५० धावांची भागीदारी करताच, सलग पाचव्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी विरोधी सलामीवीरांना अर्धशतकी भागीदारी करू दिली आहे. १९७४ सालापासून वनडे क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय संघाने अशी नकोशी कामगिरी प्रथमच केली आहे.
ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी केली भारतीय गोलंदाजांची धुलाई
वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्याच्या अपेक्षेने भारतीय संघ मैदानात उतरला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर ऍरॉन फिंच व डेविड वॉर्नर यांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेतली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी २२.५ षटकात १४२ धावांची मोठी भागीदारी रचली.
सलग पाचव्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी करू दिली सलामीवीरांना अर्धशतकी भागीदारी
ऑस्ट्रेलियन सलामीवीरांच्या या १४२ धावांच्या भागीदारी दरम्यान भारतीय गोलंदाजांनी आपल्या नावे एका नकोश्या विक्रमाची नोंद केली. भारताचे गोलंदाज सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात विरोधी सलामीवीरांना ५० पेक्षा कमी धावात बाद करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघाने आपली अखेरची वनडे मालिका फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंड दौर्यावर खेळली होती. या मालिकेत भारतीय संघाला ३-० असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला होता.
न्यूझीलंड दौर्यावर गप्टील-निकोल्स जोडीने लुटल्या होत्या सातत्याने धावा
न्यूझीलंड दौऱ्यावरील पहिल्या दोन वनडे सामन्यांत न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टील व हेन्री निकोल्स यांनी अनुक्रमे ८५ व ९३ धावांची सलामी दिली होती. मालिकेतील अखेरच्या वनडे सामन्यात गप्टील-निकोल्स जोडीने पहिल्या गड्यासाठी १०६ धावा जोडल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाने उभारला ३८९ धावांचा डोंगर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंच व डेविड वॉर्नर यांनी भारतीय गोलंदाजांविरूद्ध १५६ धावा चोपल्या होत्या. आजदेखील पहिल्या सामन्याची पुनरावृत्ती करत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन सलामीवीरांना १४२ धावा लुटू दिल्या. त्यानंतरही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भारतीय गोलंदाज रोखू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्टीव्ह स्मिथने शतकी, तर मार्नस लॅब्यूशाने व ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके ठोकत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३८९ पर्यंत पोहोचवली.
भारताविरुद्ध सलग पाचव्यांदा ५०+ धावांची सलामी भागीदारी
फिंच-वॉर्नर १४२ सिडनी
फिंच-वॉर्नर १५६ सिडनी
गप्टील-निकोल्स १०६ माऊंट मॉन्गुई
गप्टील-निकोल्स ९३ ऑकलंड
गप्टिल-निकोल्स ८५ हॅमिल्टन
ट्रेंडिंग लेख-
भारताविरुद्ध ५ वे शतक ठोकणाऱ्या स्मिथचे सचिन, पाँटिंगसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान
अफलातून! दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडच्या २३ वर्षीय फलंदाजाने शतकी खेळीसह केला भारी रेकॉर्ड
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
“रोहित शर्माने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये करावे भारतीय संघाचे नेतृत्व”
संकटमोचक पांड्या ! शतकवीर स्मिथला तंबूत धाडत हार्दिकचे जोरदार पुनरागमन