कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत आयसीसी वर्ल्ड ११ या संघासह एकूण १३ संघांनी एकतरी कसोटी सामना खेळला आहे. तर युएईसह एकूण १२ देशांच्या भूमीवर कसोटी सामने खेळवले गेले आहे. युएई हे पाकिस्तान संघाचे सध्याचे होम ग्राऊंड असल्याने त्यांचे कसोटी सामने तेथे होतात. तर आयर्लंड व अफगाणिस्तान हे देश नव्यानेच कसोटी मान्यता मिळाल्यामुळे कसोटी खेळणारे देश आहेत.
यातील अफगाणिस्तानचे मायदेशातील कसोटी सामने हे भारतात होतात तर आयर्लंडने आपल्या देशात एक कसोटी सामना खेळला आहे.
जर आपण कसोटीत खेळणारे जुने मुख्य १० देशांबद्दल बोललो तर या प्रत्येक देशाच्या भूमीवर शतक करणारे केवळ दोन कसोटीपटू आजपर्यंत झाले आहेत.
२. राहुल द्रविड-
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने कसोटीत ३६ शतके केली असून कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो ५वा आहे. एकेकाळी त्याच्या नावावर एक खास विक्रम होता, ज्याची सतत चर्चा व्हायची. तो विक्रम म्हणजे कसोटीत १० देशांत शतकी खेळी करणारा एकमेव खेळाडू.
द्रविडने कसोटी खेळणाऱ्या प्रमुख १० देशांपैकी १० देशांच्या भूमीवर दमदार शतकी खेळी केल्या आहेत. अगदी सचिन तेंडूलकरलाही हा विक्रम करता आलेला नाही. ४ कसोटी सामने खेळूनही सचिनला झिंबाब्वे देशात शतकी खेळी करता आलेली नाही. सचिन नाही तर जॅक कॅलिस, कुमार संगकारा, रिकी पाॅटींग, सुनिल गावसकर, ब्रायन लारा किंवा माहेला जयवर्धनेलाही हा कारमाना करता आलेला नाही.
१. युनूस खान-
पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खानने कसोटी खेळणाऱ्या या १० देशांत शतकी खेळी केलीच आहे परंतु त्याने युएईमध्येही शतकी खेळी केली आहे. अशाप्रकारे ११ देशांत शतकी खेळी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
कसोटी कारकिर्दीत ३४ शतके करणाऱ्या युनूसने ११ वेगवेगळ्या देशांत हा कारनामा केलाय हे विशेषच. ११८ कसोटी खेळलेल्या युनूसने अगदी ११६व्या कसोटीत ऑस्ट्रेलियात कसोटी शतक करत ११ देशांत शतके करण्याचा कारनामा केला.