सिडनी। ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला टी२० विश्वचषकात आज पार पडलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा पराभव करत अंतिम सामना गाठला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघाला डकवर्थ लूईस नियमानुसार ५ धावांनी पराभूत करत ६ व्यांदा महिला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
आता ८ मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात या विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. आज भारतीय महिला संघाचा इंग्लंड महिला संघाविरुद्ध होणारा पहिला उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे अ गटात अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १३४ धावा केल्या. पण त्यानंतर पाऊस सुरु झाला. त्यामुळे सामना काही वेळासाठी थांबला होता.
काहीवेळाने पाऊस थांबल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लूईस नियमानुसार १३ षटकात ९८ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला १३ षटकात ५ बाद ९२ धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्ड २७ चेंडूत सर्वाधिक नाबाद ४१ धावांची खेळी केली. तिने यात ३ चौकार आणि २ षटकार मारले. तिसा सुन लूसने चांगली साथ दिली होती. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी रचली होती. मात्र लूस २१ धावांवर असताना १२ व्या षटकात बाद झाली.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १९ धावांची गरज होती. मात्र त्यांना १३ धावाच करता आल्या. हे षटक ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासनने टाकले होते.
त्याआधी दक्षिण आफ्रिकेकडून सलामीला खेळायला आलेल्या लिझेल लीने १० धावा आणि कर्णधार डॅन वॅन निकर्कने १२ धावा केल्या होत्या. मात्र त्यांच्यानंतर मिगनॉन डू प्रीझ शून्यावर तर क्लो ट्र्यॉन १ धाव करुन बाद झाली.
ऑस्ट्रेलियाकडून मेगन शटने २ विकेट्स घेतल्या, तर जेस जोनासन, सोफी मोलिनेक्स आणि डेलिसा किमिन्सने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना कर्णधार मेग लेनिंगने सर्वाधिक नाबाद ४९ धावांची खेळी केली. त्याचबरोबर बेथ मूनीने २८, यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेलीने १८ आणि रेचल हाईन्सने १७ धावा केल्या. मात्र जेस जोनासन(१) आणि एश्ले गार्डनर(०) लवकर बाद झाल्या. तर निकोला कॅरे ७ धावांवर नाबाद राहिली.
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना नादीन डी क्लार्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच आयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
–निवड समितीच्या नवीन अध्यक्षाविषयी हे माहित आहे का? घ्या जाणून…
–सेमीफायनलप्रमाणे फायनलही रद्द झाली तर हा संघ जिंकणार विश्वचषक
–वर्ल्डकपची फायनल आणि हरमनप्रीत कौरचा बर्थ डे – घडणार मोठा इतिहास