बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७७ व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स व तेलगू टायटन्स हे संघ समोरासमोर आले. अनुक्रमे सहाव्या व बाराव्या स्थानी असलेल्या संघांमधील सामना चांगलाच रंगतदार झाला. अखेरच्या मिनिटापर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांना स्पर्धेतील १५ वा टाय सामना पाहायला मिळाला.
सामन्याचा पहिला हाफ दोन्ही संघांनी अत्यंत आक्रमक खेळला. हरियाणने रेडींग तर तेलगूने डिफेन्समध्ये गुण मिळवले. आदर्श व संदीप कंडोला यांनी तेलगूसाठी प्रत्येकी चार गुण मिळवले. तर हरियाणासाठी कर्णधार विकास कंडोला, विनायक रोहित गुलिया यांनी कमाल केली. पहिला हाफ संपला तेव्हा हरियाणा संघ २०-१९ असा आघाडीवर होता.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच तेलगू संघाचा कर्णधार रोहित कुमार याने सुपर रेड करत संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर पाच मिनिटे तेलगू संघाकडे आघाडी कायम होती. मात्र, आधी विनय व त्यानंतर विकास कंडोला यांनी सुपर रेड करत हरियाणा संघाला पुन्हा आघाडीवर नेले. अखेरच्या तीन मिनिटात हरियाणाकडे पाच गुणांची आघाडी होती. अंकित बेनीवाल याने दोन गुण घेत आघाडी केवळ तीन गुणांची केली. अखेरच्या मिनिटात सुपर टेन करणाऱ्या विकास कंडोलाला बाद करण्यात तेलगू टायटन्सने बाद करण्यात यश मिळवले. रेडर अंकित बेनीवाल यांनी विनयला बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. सामन्यातील अखेरच्या रेडमध्ये टायटन्सने विकासला बाद करत सामना ३८-३८ असा टाय केला.