इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड याला देखील या लिलावात चांगली मागणी होती. त्याला अखेरीस रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
Josh Hazlewood is SOLD to @RCBTweets for INR 7.75 crore #TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
आपल्या अचूक गोलंदाजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या हेजलवूडसाठी त्याची पूर्वीची फ्रॅंचाईजी चेन्नई सुपर किंग्जने सुरुवातीची बोली लावली. मात्र, लवकरच मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबादने लिलावात उडी घेतली. त्याची बोली ५ कोटीच्या पुढे गेल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या लिलावात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी अखेरपर्यंत किल्ला लढवत ७ कोटी ७५ कोटी रुपयांमध्ये त्याला संघात सामील करून घेतले. हेजलवूड २०२१ टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सामनावीर ठरला होता. त्याच्याकडे संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे.