इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम अवघ्या ७ दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २६ मार्चपासून आयपीएल २०२२ला सुरुवात होत आहे. अनेक युवा खेळाडू या हंगामात आपला जलवा दाखवण्यासाठी आतुर आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचा प्रतिभावान फलंदाज निकोलस पूरनचाही समावेश आहे. पूरनने मागच्या हंगामात आणि टी२० विश्वचषकात निराशाजनक कामगिरी केली होती. मात्र, आता तो आयपीएल २०२२मध्ये जोरदार प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला १०.७५ कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले आहे. माध्यमांशी बोलताना त्याने आपल्या आयपीएलच्या तयारीबद्दल चर्चा केली आहे.
“यंदाच्या आयपीएलमधील तू वेस्ट इंडिजचा सर्वात महागडा खेळाडू आहेस. यामुळे तुझ्यावर काही दबाव असेल का?” असे विचारले असता, निकोलस पूरन (Nicholas Pooran) म्हणाला, “एक व्यावसायिक खेळाडू म्हणून, हे अधूनमधून घडते. विशेषतः जेव्हा तुमची कामगिरी चांगली नसते. मग मीडिया तुम्हाला टार्गेट करतो आणि चाहतेही तुमच्यावर टीका करतात. मात्र, एक व्यावसायिक खेळाडू म्हणून तुम्हाला यातून बाहेर पडत संघासाठी खेळावे लागते.”
“तुझा शेवटचा हंगाम फार चांगला नव्हता आणि तू पंजाब किंग्जसाठी फक्त ७.७५ च्या सरासरीने धावा केल्या. या हंगामात तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल, असं वाटतं का?” यावर पूरन म्हणाला, “नाही, तसे नाही. फक्त एक खराब हंगाम मला खेळाडू म्हणून बदलणार नाही. मी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करत आहे आणि सर्वजण ते पाहत आहेत. सनरायझर्सने माझ्यावर पैसे गुंतवले आहेत आणि चांगली कामगिरी करत मला ते पैसे परत करायचे आहेत.”
“अशा गोष्टी घडत राहतात. असा टप्पा प्रत्येकाच्या करिअरमध्ये येतो. गेल्या वर्षी पहिल्याच सामन्यात मी पहिल्याच चेंडूवर बाद झालो होतो. पुढच्या सामन्यात मी दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झालो. तिसऱ्या सामन्यात मला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही आणि मी धावबाद झालो. मात्र, आता मी इतका विचार करत नाही. मी आता पहिल्यापेक्षा चांगला खेळाडू आहे आणि गेल्या हंगामापासून मी खूप काही शिकलो आहे.”
“सर्व खेळाडूंना काही तांत्रिक समस्या आहेत, परंतु माझ्यासाठी ते अधिक मानसिक होते. एकदा मी माझ्या झोनमध्ये पोहोचलो की, सर्व काही ठीक होईल. गेल्या काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मला काय करायचं आहे, याची कल्पना आली आहे. आशा आहे की, हे असेच चालू राहील आणि मला स्वतःला सिद्ध करायचे आहे असे म्हणणे लोक बंद करतील,” असेही पुढे बोलताना पूरन म्हणाला.
पूरनच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ३३ सामने खेळताना २२.४४च्या सरासरीने ६०६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ अर्धशतकेही ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जच्या नव्या कर्णधारापुढे असतील बरीच आव्हाने, माजी कॅप्टनने केले सावधान