शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने स्वरक्त सांडुन स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती त्या प्रकारे कुमार सचिन ने सियालकोटच्या रणांगणावर स्वरक्ताच्या साक्षिने प्रति केली “मी तेंडुलकर कुलोत्पन्न..रजनी रमेशपुत्र प्रतिग्या करतो जोवर स्वराज्य स्थापन करणार नाही तोवर युद्धातुन निवृत्त होणार नाही!”
पुढे १९९२ मध्ये आफ्रिके सोबत दिवस रात्रीचे अटीतटीचे युद्ध जाहले..शेवटच्या क्षणी गोलास्त्राचा मारा कोण करणार प्रश्न पडला!
शाहीर प्रसंगाचं वर्णन करित म्हणतो;
“आफ्रिकेची किर्ती बेफाम
भल्या भल्यांना फुटला घाम!
सेनापती अजहरने दरबार बोलावला!
मोठमोठ्या गोलंदाजांसमोर विडा फिरवला
नजरेत सगळ्यांच्याच डर
कोणी घेई ना पुढाकार
साऱ्यांनीच मानली हार
तेवढ्यात उठला एक मराठी सरदार!
नाव त्याचे सचिन तेंडुलकर!
त्याने विडा उचलला!
तो म्हणला मी टाकीन गोलास्त्र!
एक फळीशस्त्र चालवणारा ..भल्या भल्यांनी जेथे हात वर केलेत तेथे हा शेवटच्या क्षणाला ह्रदयाच्या ठोके बंद पाडणाऱ्या युद्धात गोलास्त्र टाकणार!
पण विश्वासाने भरलेल्या त्या सुकुमाराने भेदक अचुक वेधक गोलास्त्र टाकुन दोन बळी घेत भारतीय मुलूखाला विजयी केले!
१९९६ मध्ये कुमारचा पराक्रम पाहता त्याचा राज्याभिषेक जाहला!ते मुलूखाचे राजे बनले!
“मराठी पाउल पडते पुढे..”
पण चंदनाला फुलं नसतात..सोन्याला सुगंध नसतो..
त्या प्रकारे प्रत्येकात सर्वच गोष्टी नसतात..
राजे तेंडुलकरांना राज्यपद नीट लाभलं नाही!राज्यपदाच्या अतिरिक्त ताणामुळे त्यांच्या स्वत:च्या पराक्रमावर परिणाम होउ लागला..अंती त्यांनी स्वत:हुन सिंहासनाचा त्याग केला!
आणि बाजीराव पेशव्यांनी स्वराज्याच्या सिंहासनाशी प्रामाणीक राहुन अटके पार झेंडे लावले त्या प्रमाणे एक योद्धा राहुनच “लंडनचेही तख्त मिळवतो महाराष्ट्र..भारत माझा..असा प्रण केला.
१९९८साली अरबस्थानातील वाळवंटात;शारजेत रणांगणावर घनघोर युद्ध जाहले ते अपराजीत महाशक्तीशाली ऑस्ट्रेलियासोबत!
२२एप्रीलची ती रात्र!परिस्थिती वाईट!अंतीम महायुद्धात प्रवेश मिळवण्यासाठी अद्वितीय कामगिरी आवश्यक होती!
तुंबळ युद्ध सुरू झाले..
आणि अचानक वाळवंटात वाळुचे वादळ उठले..
युद्ध थांबवावे लागले.
राजे सचिन आपल्या गोटात मस्तकावरील शिरस्त्राण न काढता आसनावर जाउन बसले..कोणाशीही एक शब्दही न बोलले..
नजर फक्त समोर कुरूक्षेत्राकडे..
काही वेळाने वाळुचे वादळ शमले.
युद्धास पुन्हा प्रारंभ झाला..
अष्टमीची रात्र होती..
नगाडे ढोल वाजत होते..
महाराज पँवेलियन गडावरून खाली येत होते..
एक वादळ शमले आणि दुसरे या मराठी सरदाराचे वादळ सुरू झाले!
समोर हैद्राबादेच्या “लक्ष्मणाला” हाताशी धरून हा राम शत्रुवर तुटून पडला!
ऑस्ट्र्लियाच्या साऱ्या फौजेला नेस्तनाभुत केले!
ऑस्ट्रेलियाचा “गोंधळी” टाकणारा मायावी गोलंदाज शेनवार्न ला पुर्णपणे झोडपुन काढले.
“गोंधळी”ला आंग्ल भषिक “गुगली”असे म्हणतात.
यावच्चंद्रदिवाकरौ २२ एप्रील आणि २४ एप्रील या तारखा इतिहासात अमर झाल्या आहेत!
त्या दिवशी राजेंचा पराक्रम बघुन अरबस्थानातील वाळवंटातील खजुराची झाडेही शहारलीत..अरबांच्या उंटांनीही कौतुकाने माना डोलवल्यात..
मुघलांच्या घोड्यांनाही पाण्यात जसे मराठी सरदार दिसायचे!तसे शेन वार्न नामक मायावी गोलंदाजाला स्वप्नातही सचिन राजे त्यांना झोडपताहेत हे दिसु लागले!
१९९९ मध्ये साता समुद्रापार गोऱ्यांच्या इंग्लंडात जागतीक महायुद्ध जाहले.
राजे सचिन संपुर्ण तयारीनिशी युद्धात उतरले.
पण नियतीच्या मनात काय होतं हे कोणासही ठाउक नव्हतं..एक मोठा आघात राजेंवर होणार होता..
तिकडे महायुद्ध पेटले होते.
आणि मुलूखात इकडे राजे सचिनचे पिताश्री नश्वर जग सोडुन गेले.
राजे वायुवेगाने मुलूखात परतले..आपले पित्या संबंधी कर्तव्य बजावले.
तेव्हा माता रजनी आपल्या सुपुत्रास म्हणल्या “सैनिकाने आपले वैयक्तिक नातीगोती आपल्या कर्तव्याआड आणु नये!मुलुखाचं वाण हाती घेतलेल्या योद्ध्याला अश्रु ढाळता येत नाही!
व्रतस्थ माणसाला फार काळ सुतक पाळता येत नाही!
राजे तुम्ही युद्धावर जावे
स्वराज्याला तुमची गरज आहे!
सचिन राजेंनी मातेस नमस्कार केला.आणि महायुद्धात परतले.
इकडे “एक व्यक्ती फौज” असलेल्या सचिन राजेंच्या अनुपस्थित भारतीय मुलुखाने दुबळ्या झिंबॉब्वे सोबत युद्ध हारले होते..
आता केनियावर मोठा विजय गरजेचा होता.राजे सचिन गोटात परतत नाहीत तर तोच त्यांना हाती शस्त्र घेउन युद्धावर जावे लागले..
त्या दिवशी त्यांनी जो पराक्रम केला..”शतक रत्न” लुटलीत!
आकाशात त्यांनी बघुन वडिलांना ते शंभर रत्न अर्पण केलेत..
सर्व भारतीयांना कोण अभिमान वाटला!!
राजे सचिन जणु स्वत: स्वत:ची संहिता लिहीत होते.
मग २००३ साली आफ्रिकेत पुन्हा जागतीक महायुद्ध छेडल्या गेले.
महाशिवरात्रीला पापस्थानासोबत महायुद्ध होणार होते…
दरम्यान भारतीय मुलुखाला जो फितुरीचा शापच आहे तो शाप पुन्हा खरा ठरला..स्वराज्य स्थापनेला मोठा धक्का बसला..
क्रमश:
लेखक- अभिजित पानसे
( फेसबुक- https://www.facebook.com/abhijeet.panse )
(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)