भारताने 1932 मध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळला. भारतीय क्रिकेटमधील पहिल्या संघात कर्नल सीके नायडू, विजय हजारे, विजय मर्चंट, मोहम्मद निसार यांसारखे दिग्गज आणि दर्जेदार खेळाडू होते. भारतीय क्रिकेटच्या याच पहिल्या पिढीत नानिक अमरनाथ भारद्वाज हे सुद्धा एक प्रमुख खेळाडू होते. क्रिकेटप्रेमी म्हणतील, असा कोणी खेळाडू भारतीय क्रिकेटमध्ये झालाच नाही! मात्र, या नावाचा खेळाडू भारतीय क्रिकेटमधील एक आदरार्थी व्यक्तिमत्व आहे. नानिक अमरनाथ भारद्वाज म्हणजेच भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ होय. शनिवारी (05 ऑगस्ट) लालाजींची पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा जीवनप्रवास पाहूयात…
जन्माने पंजाबी असलेल्या लालाजींचे संपूर्ण बालपण लाहोरमध्ये अजमत राणा व शफाकत राणा या दांपत्याच्या घरी गेले. 1933 मध्ये त्यांनी दक्षिण मुंबईतील बॉम्बे जिमखाना मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला. त्याकाळी मुंबईत ख्रिश्चन, पारसी व हिंदू संघामध्ये चौरंगी मालिका होत. लालाजी या मालिकेत हिंदू संघासाठी खेळले. त्याचवर्षी त्यांनी दक्षिण पंजाबकडून खेळताना मेरीलेबोन क्रिकेट क्लबविरुद्ध 109 धावांची शतकी खेळी केली. भारत दौर्यावर असलेल्या इंग्लंड संघाविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी त्यावेळी संघ निवडला जाणार होता. त्यादृष्टीने लालाजींची ही खेळी निश्चितच उपयुक्त ठरली. अपेक्षेप्रमाणे त्यांची भारतीय संघात निवड झाली.
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या बॉम्बे जिमखाना मैदानावर होता. इंग्लंडच्या वेरीटी, निकोल्स, लैंग्रिज या दिग्गज गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव अवघ्या 219 धावांवर संपुष्टात आणला. ब्रायन व्हॅलेंटाइन यांच्या शतकाच्या सहाय्याने इंग्लंडने 438 धावांचा डोंगर रचला. वजीर अली व जनार्दन नवले ही जोडी झटपट तंबूत परतल्यानंतर कर्णधार सी के नायडू व लालाजींनी भारताचा डाव सावरला. दोघांनी 187 धावांची भागीदारी रचत भारताला सामन्यात जिवंत ठेवले. कर्नल नायडू वैयक्तिक 67 धावांवर बाद झाल्यावर लालाजींनी डावाची सूत्रे हाती घेत शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून पहिले शतक झळकावण्याचा मान लालाजींना मिळाला. लालाजी बाद झाल्यावर इतर फलंदाजांनी हाराकिरी केली व भारत 258 धावांवर सर्वबाद झाला. विजयासाठी मिळालेले 40 धावांचे आव्हान इंग्लंडने सहजरीत्या पार केले. भारत सामना हरला असला तरी लालाजींचे नाव मात्र इतिहासात लिहिले गेले.
सन 1936च्या इंग्लंड दौऱ्यावर झालेला वाद हा भारतीय क्रिकेट इतिहासातील एक काळा डाग आहे. दुर्देवाने यात लालाजीसुद्धा सामील होते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विवादित व्यक्तिमत्व म्हणजे, विजयनग्रामचे महाराज कुमार म्हणजेच विझी त्या दौऱ्यात भारतीय संघाचे कर्णधार होते. आपल्या मनमानी कारभारासाठी ते चांगलेच प्रसिद्ध झालेले. कर्नल सीके नायडू, विजय मर्चंट व लालाजी त्यांच्या कप्तानी व खेळावर नाराज होते. अशावेळी, लॉर्ड्सवरील एका काउंटी संघाविरूद्धच्या सामन्यात लालाजी दुखापतग्रस्त असताना, विझी यांनी त्यांना खेळण्यासाठी तयार होण्यास सांगितले. लालाजी तयार झाले तरी त्यांनी लालाजींच्या आधी दुसऱ्या फलंदाजांना फलंदाजीसाठी पाठवले. दिवसाच्या शेवटी लालाजींना फलंदाजी करण्यासाठी पाठविण्यात आले. त्यावर नाराज झालेल्या लालाजींनी, ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ घातला. तेव्हा विझी यांनी शिस्त न पाळण्याचे कारण देऊन लालाजींना पुन्हा मायदेशी पाठवून दिले. याच दौऱ्यावर, विझी यांनी मुश्ताक अली यांना सोन्याचे घड्याळ भेट देत विजय मर्चंट यांना धावबाद करण्यासाठी सांगितल्याचा किस्सा समोर आला होता.
दुसर्या महायुद्धापूर्वी लालाजींनी फक्त 3 कसोटी सामने खेळले. महायुद्धाच्या काळात भारताने कोणतेही अधिकृत कसोटी सामने न खेळल्यामुळे लालाजींची उमेदीची वर्ष वाया गेली. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी 21 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.
सन 1947 मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाचे कर्णधार म्हणून लालाजींची नियुक्ती करण्यात आली. याच बरोबर, स्वतंत्र भारताचे पहिले कसोटी कर्णधार बनण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला. डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांना हिटविकेट करणारे लालाजी एकमेव गोलंदाज आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा 1952 मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका जिंकली होती. भारताने ही कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. भारतीय संघाने कोणत्याही संघाविरुद्ध जिंकलेली ही पहिली मालिका होती.
सन 1955 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी त्यांच्या खात्यात 24 कसोटीमध्ये 878 धावा व 45 बळी होते. पहिल्या सामन्यात ठोकलेल्या शतकासारखी कामगिरी त्यांना पुन्हा करता आली नाही. पण, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 10000 हून अधिक धावा त्यांनी फटकावल्या होत्या. त्यावेळी अशी कामगिरी करणारे ते पहिलेच भारतीय फलंदाज होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी गुजरात, हिंदू, महाराजा ऑफ पटियाला इलेव्हन, रेल्वे, दक्षिण पंजाब आणि उत्तर प्रदेश या संघांचे प्रतिनिधित्व केले.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले. चंदू बोर्डे, एम एल जयसिम्हा, जसू पटेल यांसारख्या भारतीय खेळाडूंना पारखण्याचे काम लालाजींनी केले होते. त्यांच्या तीन मुलांपैकी सुरींदर अमरनाथ व मोहिंदर अमरनाथ यांनी भारतीय क्रिकेटची वडिलांप्रमाणेच अनेक वर्षे सेवा केली.
भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणने गौरवले. 2011 मध्ये बीसीसीआयने लालाजींच्या नावाने रणजी ट्रॉफीमधील आणि मर्यादित षटकांच्या देशांतर्गत स्पर्धांत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू क्रिकेटपटूला पुरस्कार द्यायला सुरुवात करत त्यांचा यथोचित सन्मान केला.
महत्त्वाच्या बातम्या-
Lala Amarnath: 89 वर्षांपूर्वी लालाजींनी भारतीयांना दाखवलेला ‘तो’ ऐतिहासिक क्षण, वाचून अभिमानच वाटेल
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या 10 गोष्टी