पंचानी हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅकग्राला आऊट दिले आणि संपूर्ण इडन गार्डनमध्ये भारतीय पाठीराख्यांनी जोरदार जल्लोष केला. फॉलोऑन देऊन जिंकायची ही कसोटी क्रिकेट मधील पहिलीच वेळ होती आणि तीही ऑस्ट्रेलिया सारख्या त्यावेळच्या बलाढ्य संघाविरुद्ध.
जी कसोटी भारत डावाने हरेल अशी वेळ आली होती ती भारताच्या दोन सार्वकालीन महान खेळाडू असणाऱ्या राहुल द्रविड आणि व्ही.व्ही. लक्ष्मण यांनी बदलली. तब्बल अडीच दिवस टिच्चून फलंदाजी करून राहुल द्रविड आणि व्ही.व्ही. लक्ष्मणने भारतीय खडूस फलंदाजी म्हणजे काय असते ते ऑस्ट्रेलियाला दाखवले.
स्टिव्ह वॉच्या ११० धावा आणि हेडनच्या ९७ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियन संघ तेव्हा कसोटी आणि एकदिवसीय अश्या दोनही प्रकारात जगात सर्वोत्तम होता.
गोलंदाजीचा जबरदस्त तोफखाना ऑस्ट्रेलियाकडे होता. वॉर्न, मॅकग्रा, कास्प्रोव्हिच आणि गिलेस्पी असा जबदस्त तोफखाना कोलकाता कसोटीमध्येही होता. आणि पहिल्या डावात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या या तोफखान्यासमोर सपशेल लोटांगण घातले. भारतीय डाव १७१ धावांवर गडगडला. भारताकडून सर्वोत्तम स्कोर हा लक्ष्मणने केला होता आणि तो होता फक्त ५९ धावा.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात तब्बल २७४ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावातील भारतीय फलंदाजी पाहून जगातील कोणत्याही कर्णधाराने जे करायला हवं होत तेच स्टिव्ह वॉने केलं. त्याने भारताला फॉलोऑन देऊन तिसऱ्या दिवशीच पुन्हा फलंदाजीस पाचारण केलं.
भारतीय संघाची दुसऱ्या डावातील अवस्था ही पहिल्या डावपेक्षा काही वेगळी नव्हती. सदगोपान रमेश, शिवसुंदर दास आणि सचिन यांनी दोन आकडी धावसंख्या करून पॅव्हेलियनचा रस्ता धरला. ११५ वर ३ अशी परिस्थिती असताना भारत दारुण पराभवाला सामोरा जाणार हे त्याच वेळी नक्की झालं होत.
राहुल द्रविड मालिकेत धावा काढण्यासाठी झगडत होता त्यामुळे जेव्हा सदगोपान रमेश आऊट झाला तेव्हा कर्णधार गांगुलीने द्रविडच्या जागी लक्ष्मणला बढती दिली आणि गांगुलीची ही चाल मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली. तिसऱ्या दिवसातील काही षटक बाकी असताना भारताची चौथी विकेट सौरव गांगुलीच्या रूपाने गेली आणि फलंदाजीला आला राहुल द्रविड . दिवसाच्या शेवटी भारतीय संघाने ४ विकेट्सच्या बदल्यात २५४ धावा फलकावर लावल्या होत्या आणि लक्षण १०९ तर द्रविड ७ धावांवर खेळत होते.
कसोटीची खरी कसोटी ही चौथ्या दिवशी लागणार होती. भारत ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी किती धावा देतो आणि ऑस्ट्रेलिया हा सामना किती लवकर खिशात घालतो एवढच त्या सामन्यात बाकी होत. १४ मार्च २००१ हा दिवस सोनेरी दिवस असेल असा विचार भल्या मोठ्या मोठ्या क्रिकेट तज्ञांनीही केला नव्हता.
गांगुली, सचिन आऊट झाल्यामुळे प्रेक्षकांनी मैदानाकडे पाठ फिरवली होती. ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्या इतिहासात ज्या फलंदाजाने नेहमीच त्रास दिला त्या लक्ष्मणच्या मनात काही वेगळच होत. १०९ धावांवर नाबाद असणाऱ्या लक्ष्मणने आपल्या ताफ्यातील सर्व फटाक्यांच्या योग्य वापर करून २७५ धावांवर नाबाद राहण्याचा विक्रम केला.
त्यावेळी २७५ ही भारताकडून वैयक्तिक सर्वोच्च कसोटी धावसंख्या होती. त्याला जबदस्त साथ दिली होती ती ११५ धावांवर नाबाद असणाऱ्या द्रविडने. भारत चौथ्या दिवशी एकही विकेट न गमावता ५८९ धावांवर होता आणि चौथ्या दिवशी तब्बल ३३५ धावांची भर धावसंख्येत ह्या जोडीने घातली होती.
पाचव्या दिवशी ६८ धावांची आणखी भर घालून ७ विकेटच्या बदल्यात भारताने आपला दुसरा डाव ६५७ धावांवर घोषित केला. त्यात ४५२ चेंडूत लक्ष्मणने २८१ धाव केल्या होत्या. ही भारताकडून वयैक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती. हा रेकॉर्ड पुढे २९ मार्च २००४ रोजी सेहवागने मुलतान कसोटीमध्ये मोडला.
राहुल द्रविडने तब्बल ३५३ चेंडू खेळून १८० धावांचा मोलाचा वाटा दुसऱ्या डावात उचलला होता. ३८३ धावांचा आव्हान घेऊन मैदावर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या फलंदाजांनी ७१ धावा कोणतीही विकेट न गमावता धावफलकावर लावली.
परंतु त्यानंतर हरभजन सिंग आणि सचिनच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. हरभजनने ६ तर सचिनने ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव २१२ धावांमध्ये संपुष्टात आणला आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील फॉलोऑन मिळाल्यानंतरचा फक्त तिसरा विजय मिळवून दिला. पॉन्टिंग, गिलख्रिस्ट आणि वॉर्नला बॅड करून कसोटी क्रिकेटमधील भारताकडून पहिली हॅट्रिक २१ वर्षीय हरभजन सिंगने घेतली.
ही कसोटी विशेष असण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील काही
कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील फॉलोऑन मिळाल्यानंतरचा फक्त तिसरा विजय
लक्ष्मणची २८१ धावांची भारताकडून सर्वोत्तम धावसंख्या
द्रविडची लक्ष्मणला १८० धावांची जबदस्त साथ
हरभजन सिंगची हॅट्रिक
सचिन तेंडुलकरच्या दुसऱ्या डावात ३ विकेट
प्रथमच इंग्लंड सोडून अशी कामगिरी करणारा भारत दुसरा देश
भारतीय क्रिकेटच्या चांगल्या दिवसांची सुरुवात
गांगुलीच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब
#ThisDayThatYear in 2001 VVS Laxman and Rahul Dravid scripted a historic Test comeback ever at the Eden Gardens in Kolkata #TeamIndia pic.twitter.com/pwRdgvSTQM
— BCCI (@BCCI) March 14, 2018