पुणे । आझम स्पोर्ट्स अकादमी, पीडीसीए संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना आझम कॅम्पस मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
किरण नवगिरेच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने आरए क्लब मुंबई संघाला तब्बल १२४ धावांनी पराभूत करताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने निर्धारित १० षटकांत १ बाद १६९ धावसंख्या उभारली.
किरण नवगिरेने आक्रमक फलंदाजी करताना ३१ चेंडूत ९९ (१० चौकार, ६ षटकार) धावांची खेळी केली. तिला सोनाली शिंदेने ५१ (१० चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. आरए क्लब संघाला हे आव्हान पेलवले नाही.
आरए क्लब संघाला निर्धारित १० षटकांत ६ बाद ४५ धावाच करता आल्या. आरए क्लब संघाकडून शबनम खानने सर्वाधिक १४ धावांची खेळी केली. प्राजक्ता आठरेने २ तर, प्रिया भोकरे व संस्कृती जगतापने प्रत्येकी १ गडी बाद केला. किरण नवगिरेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अतितटीच्या झालेल्या लढतीत फाल्कन्स पुणे संघाने वेरॉक वेंगसरकर अकादमी संघाला ३ गडी राखून पराभूत केले. वेरॉक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १५ षटकांत ५ बाद ९९ धावांपर्यंत मजल मारली.
श्रद्धा पोखरकरने ३३ (३ चौकार), खुशी मुल्ला १३ (१ चौकार), स्वांजली मुळे १३ धावांची खेळी केली. गौरी नगरकरने २ तर, अक्षदा ढोबळे व सविता ठाकरने प्रत्येकी १ गडी बाद केला. फाल्कन्स संघाने निर्धारित १५ षटकांत ७ बाद १०० धावा करताना ही लढत जिंकली. फाल्कन्सच्या पार्वती बकालेने ३५ (३ चौकार), केतकी खांडेकर १० तर सारिका दारके १० (२ चौकार) धावांची खेळी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
श्रद्धा पोखरकर व आरती बेनिवाल यांनी प्रत्येकी २ तर, मनाली जाधव व मानसी तिवारी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पार्वती बकालेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पीडीसीए संघाने आरए क्लब मुंबई संघाला ८ गडी राखून पराभूत करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. आरए क्लब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १५ षटकांत ८ बाद ४४ धावा केल्या.
शीतल तेलीने १६ धावांची खेळी केली. रोहिणी माने व प्रांजली पाटील यांनी प्रत्येकी २ तर उत्कर्षा देशपांडेने एक गडी बाद केला. पीडीसीए संघाने ५.१ षटकांत २ बाद ४५ धावा करताना ही लढत जिंकली.
पीडीसीए संघाकडून अदिती काळेने १० तर आयेशा शेखने ९ धावांची खेळी केली. अक्षदा तारकरने एक गडी बाद केला. प्रांजली पाटीलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : आझम स्पोर्ट्स अकादमी : १० षटकांत १ बाद १६९ (किरण नवगिरे ९९ (१० चौकार, ६ षटकार), सोनाली शिंदे ५१ (१० चौकार)) वि वि आरए क्लब मुंबई १० षटकांत ६ बाद ४५ (शबनम खान १४, सृष्टी नाईक ७, प्राजक्ता आठरे १-०-२-२, प्रिया भोकरे २-०-८-१, संस्कृती जगताप १-०-५-१)
वेरॉक वेंगसरकर अकादमी : १५ षटकांत ५ बाद ९९ (श्रद्धा पोखरकर ३३ (३ चौकार), खुशी मुल्ला १३ (१ चौकार), स्वांजली मुळे १३, गौरी नगरकर ३-०-१४-२, सविता ठाकर २-०-६-१, अक्षदा ढोबळे २-०-२३-१) पराभूत वि पुणे फाल्कन : १५ षटकांत ७ बाद १०० (पार्वती बकाले ३५ (३ चौकार), केतकी खांडेकर १०, सारिका दारके १० (२ चौकार), श्रद्धा पोखरकर ३-०-१५-२, आरती बेनिवाल ३-०-१५-२, मानसी तिवारी २-०-१४-१, मनाली जाधव ३-०-२०-१)
आरए क्लब मुंबई : १५ षटकांत ८ बाद ४४ (शीतल तेली १६, रोहिणी माने ३-०-८-२, प्रांजली पाटील ३-१-५-२, उत्कर्षा देशपांडे ३-१-२-१) पराभूत वि. पीडीसीए ५.१ षटकांत २ बाद ४५ (अदिती काळे १०(१ चौकार), आयेशा शेख ९ (२ चौकार), अक्षदा तारकर १.१-०-२-१).