१२ मार्चपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ३ सामन्यांती वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचे काल धरमशाला येथे आगमन झाले आहे. या मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार आहे.
पण सध्या जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे. त्याचमुळे कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यात हस्तोंदलन करणार नाही, असे दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने स्पष्ट केले आहे. भारतात सध्या जवळपास ४०पेक्षा अधिक रुग्ण कोरोना व्हायरसचे आढळले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यात आरोग्य संबंधिक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करेल. याबद्दल भारत दौऱ्यावर येण्याआधी बाऊचर यांनी सांगितले की ‘जर आपण हस्तांदोलन आणि यासारख्या गोष्टींबद्दल बोललो तर आम्ही यापासून शक्य तितक्या दूर राहण्याचा प्रयत्न करू. मला वाटते की आपल्या संघातील खेळाडूंचे आरोग्य सांभाळण्याचा हा एक मार्ग आहे.”
तसेच बाऊचर पुढे म्हणाले, मैदानावरील खेळाडूंचा आदर आहे पण यामागे एवढाच विचार आहे की कोणत्याही चूकिच्या गोष्टी एकमेकांकडे यामुळे पसरु नयेत.
बाउचर म्हणाला, ‘हे पहा आमच्याकडे सुरक्षा स्टाफ आहे आणि जर आरोग्यासंबंधीत काही गोष्टी असतील तर आम्ही त्या त्यांच्यावर सोपवू. त्यावर ते काही शिफारसी करतील. जर त्यांना यात काही धोकादायक वाटले, तर ते आम्हाला यातून बाहेर यायला सांगतील.’
‘कोविड१९’ ही चिंताजनक बाब आहे. तसेच दक्षिण आफ्रिका संघाला वैद्यकिय पथकाने याबाबद सर्व माहिती दिली आहे., असेही बाऊचर यांनी सांगितले.