स्काइल्ड बेरी नामक पत्रकार एकदा म्हटला होता, “कोण म्हणतो त्याचा “स्टान्स” नीट नाही? जर तुम्ही स्क्वेअर लेग अंपायर जवळून चेंडू टाकला तर व्यवस्थित उभा असलेला दिसेल तो!” शिवनारायण चंदरपॉलचा त्याच्या पवित्र्यामुळे “क्रॅब” अर्थात खेकडा म्हणून ओळखला जाई! खेकड्याचा एक गुणही त्याने उचलला होता, “चिवटपणा”!
गयाना मधील युनिटी व्हिलेज हे शिवनारायण चंद्रपॉलचे जन्मगाव. गयानाचाच आणखी एक श्रेष्ठ क्रिकेटपटू रोहन कान्हाय त्याचा गुरू. त्या भागात कन्हायला “टायगर” म्हणून ओळखत! क्रिकेट विद्येबरोबर शिवनरेनला आपलं नावही दिलं कन्हायने. गयानाने विंडीज क्रिकेटला दिलेल्या गुणी क्रिकेटपटूंमध्ये कन्हाय आणि शिव सर्वश्रेष्ठ असावेत.
चंद्रपॉलचे आंतराष्ट्रीय पदार्पण १९९४ मध्ये झाले. विंडीज बुरुज कोसळत्या, जीर्ण अवस्थेत असताना झालेले. ढासळलेली फलंदाजी फळी आणि सामना वाचवण्याची धडपड हे तिथून पुढे शिव साठी नेहेमीचेच चित्र होऊन गेले! लारा, हुपर हीच काय ती त्याला साथ असायची.
भागीदाऱ्या करण्यात शिवनरेनचा जन्म गेला. त्याचे यामधील विक्रम वेड लागावे असे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो विक्रमी ७५० भागीदाऱ्यांमध्ये सहभागी आहे. नॉन स्ट्रायकर एन्ड वरून कारकिर्दीत त्याने आपल्या ५०० सहकार्यांना बाद होताना पाहिले आहे, हाही एक विश्वविक्रमच!
भागीदाऱ्या रचणे म्हणजे त्याच्या डाव्या हातचा मळ असावा. ऑस्ट्रेलिया विंडीजला आले होते तेव्हाची गोष्ट. पहिल्या डावात दोन्ही संघ २४० वर बाद झालेले. विंडीजला पाठलाग करताना लक्ष्य होते ४१८ धावांचे! अशावेळी त्याने रामनरेश सारवान सोबत एक विक्रमी भागीदारी रचली. त्यामध्ये सारवान १०५ तर शिव १०४ धावा… गंमतच आहे ना! विंडीजने ४१८ धावांचा पाठलाग करत विश्वविक्रमी विजय मिळवला होता.
२००० नंतर कसोटीत विंडीजच्या फलंदाजीत केवळ चारच जण पाच हजार मनसबदार झाले. लारा (६,३३९), सारवान (५,८४२), गेल (७,२१४) आणि शिव (९,६३३). ही शिव पुण्याई सहसा अदृश्यच राहिली.
शिवनरेन तीन दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. असे करू शकणारे केवळ तिघेच… सचिन, जयसूर्या आणि हा! शिवनरेन १६४ कसोटी खेळला विंडीज साठी. त्यात ५१.३७ च्या सरासरीने ११,८६७ धावा केल्या आहेत त्याने. ब्रायन चार्ल्स लारा, सर व्हीवियन रिचर्ड्स आणि क्लाईव्ह लॉइड यांना मागे टाकणारी ११,८६७ वी धाव! गयाना वरून आलेल्या त्या पोराला आनंद झाला असेल तेव्हा!
गयाना मधील शेतकरी खेमराज आणि उमा चंदरपॉल यांचा शिवनरेन मुलगा. चंद्रपॉल कुटुंब गयाना मधील हिंदू धर्मीय. अनेक शतकांपूर्वी इथून तिकडे गेलेल्या अनेक भारतीयांपैकी एक. दक्षिण अमेरिकेत आहे गयाना, अगदी उत्तरेला. खाली ब्राझील, अर्जेंटिना, उरूग्वे, कोलंबिया वगैरे लांबलांब पसरलेले फुटबॉल साम्राज्य. गयाना क्रिकेटची शेवटची गढी! त्या अफाट फुटबॉल साम्राज्याला थोपवणारी. शिव त्याचा किल्लेदार… वर्षानुवर्षे चिवट, कडवी लढत देणारा!
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचे. जवळपास निम्मा संघ गारद झालेला असताना. क्रीझ वर येऊन स्टंप वरील बेल उचलायची, वाकून पिचवर छोटा खुणेचा खड्डा करायचा आणि तयार व्हायचे फलंदाजीला. त्याच्या जगप्रसिद्ध पवित्र्यात! लहानपणी तोंडावर आदळलेले अगणित चेंडू आणि सुजलेले तोंड… म्हणून तर त्याचा असा विचित्र स्टान्स होता. गोलंदाजांचा चेहरा आणि चेंडू दिसावा हे त्यामागचे कारण!
द्रविड, पॉंटिंग कॅलिस यांसारखे समकालीन श्रेष्ठ त्याच्या मागून येऊन निवृत्त झाले तरीही हा खेळतच राहिला. युगानुयुगे हा खेळतोय असे वाटायचे. त्याचा मुलगा टॅन्जेरीन चंद्रपॉल सोबत परवा एकत्र खेळला तो! त्याची उपयुक्तता त्याच्या महानतेला गाठून पुढे गेली होती. एक कीबोर्ड असतो अनेक बटणे असलेला. आपापली महत्ता आणि गरज असलेली अनेक बटणे असतात, स्पेस बटण असते त्यात, सर्वात मोठे आणि सर्वात जास्त वापरले जाणारे… आणि सर्वात दुर्लक्षित देखील. शिव क्रिकेट कीबोर्डवरील स्पेस बटण आहे… सर्वात उपयुक्त तरीही सर्वात दुर्लक्षित. Nonetheless important indeed!
या सिरीजची सुरुवातच शिवनरेन चंद्रपॉलला डोळ्यासमोर ठेवून केली होती. क्रिकेटमधील सर्वात जास्त विस्मृतीत गेलेला खेळाडू जर कोण असेल तर तो शिवनरेन चंद्रपॉल. Crab of Cricket… King Crab!
वाचा- वेस्ट इंडीजचा द्रविड म्हणून ओळख असलेला चंद्रपाॅल डोळ्याखाली का लावायचा काळी पट्टी?