भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले ३ सामने पार पडले असून सध्या भारतीय संघ २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे. असे असताना या मालिकेतील पहिल्या सामन्यापासूनच सामन्यांतील खेळाडूंच्या कामगिरी बरोबरच खेळपट्टीबद्दलही बरीच चर्चा रंगत आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी फिरकीला अनुकुल खेळपट्ट्या बनवल्याची टीका भारतावर केली. त्यामुळे सध्याच्या संघातील भारतीय क्रिकेटपटूंकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.
नुकतेच आर अश्विनने खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना चांगली खेळपट्टी म्हणजे काय? चांगल्या खेळपट्टीचे नियम काय आहेत? असे प्रश्न विचारत धारेवर धरले होते. आता भारताचा सलामीवीर रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक खोचक पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये रोहितने तो मैदानात पालथा झोपून समोर पाहात असलेला स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की ‘चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल, याचा विचार करत आहे.’
रोहितच्या या पोस्टला चाहत्यांची मोठ्याप्रमाणात पसंती मिळत असून अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CL1iahkBR6M/?igshid=1c91ziqbqjpt4
अहमदाबादच्या खेळपट्टीवरुन वाद शिगेला
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना झाला. हा सामना २ दिवसातच भारताने १० विकेट्सने जिंकला. या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून गेलेल्या ३० विकेट्सपैकी २८ विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या होत्या. त्यामुळे खेळपट्टीवर फलंदाजांना काहीच मदत नव्हती, खेळपट्टी केवळ फिरकी गोलंदाजांना अनुकुल होती, अशा टीका झाल्या. माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन, मायकल वॉन, युवराज सिंग यांनी खेळपट्टीवर निशाणा साधला होता.
मात्र, ग्रॅमी स्वान, नासिर हुसेन यांसारख्या काही माजी क्रिकेटपटूंनी खेळपट्टीला दोष देणे योग्य नसल्याचे म्हटले होते.
अश्विनचे खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्यूत्तर
तिसऱ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत भारताचा फिरकीपटू आर अश्विनलादेखील खेळपट्टीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्याने खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना फटकारले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा अश्विनला खेळपट्टीबद्दल एका इंग्लिश पत्रकाराने प्रश्न विचारला असता अश्विन म्हणाला, ‘चांगली क्रिकेट खेळपट्टी म्हणजे काय? गोलंदाजांना मदत मिळत असताना फलंदाजांना धावा करण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागते. त्याबद्दल कोणतीच शंका नाही. चांगली खेळपट्टी कशी असते? तिची व्याख्या काय? पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत, मग चांगली फलंदाजी करा आणि मग शेवटच्या दोन दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत, हे नियम कोणी बनवले आहेत. आता यातून आपल्याला बाहेर पडले पाहिजे. याबद्दल नेहमीच समस्या उभ्या करुन अर्थ नाही.’
भारत विरुद्ध इंग्लंड संघात आता उर्वरित शेवटचा कसोटी सामना ४ मार्चपासून होणार आहे. हा सामना देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
यंदाच्या वर्षात भारत, इंग्लंडच्या खेळाडूंचा कसोटीत दबदबा, पाहा दोन महिन्यातील संघांची कामगिरी
आयपीएल २०२१ पूर्वी धोनीनी दिली ‘या’ मंदिराला भेट, चाहत्यांबरोबर सेल्फीही काढले, पाहा फोटो