भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या वनडे मालिका सुरु आहे. ही तीन सामन्यांची वनडे मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ही मालिका पुण्यात होत असल्याने, त्याच पार्श्वभूमीवर आपण पुण्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमबद्दल जाणून घेऊ.
2. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे हे पुण्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम आहे. या स्टेडीयमवर आत्तापर्यंत केवळ 10 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये 5 वनडे, 3 टी20 आणि 2 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व 10 सामन्यात भारतीय संघ खेळला आहे. भारताला यातील 6 सामनेच जिंकता आले आहेत.
या स्टेडीयमवर पहिला सामना 20 डिसेंबर 2012ला भारत विरुद्ध इंग्लंड संघात झाला होता. हा टी20चा सामना होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. या स्टेडीयमवर आयपीएलचेही अनेक सामने झाले आहेत.
1. नेहरु स्टेडियम, पुणे
गहुंजेच्या स्टेडीयमवर आंतरराष्ट्रीय सामने सुरु होण्याआधी पुण्यातील नेहरु स्टेडीयमवर नोव्हेंबर 2005 पर्यंत भारताचे आंतरराष्ट्रीय सामने होत होते.
नेहरु स्टेडीयमवर 11 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळवण्यात आले. यातील 8 सामन्यात भारतीय संघाचा समावेश होता. विशेष म्हणजे याच मैदानावर केनियाने 1996 च्या विश्वचषकात बलाढ्य वेस्ट इंडीजचा पराभव केला होता.
क्लब ऑफ महाराष्ट्र नावानेही ओळखले जाणाऱ्या या स्टेडीयमवर पहिला सामना 5 डिसेंबर 1984 ला भारत विरुद्ध इंग्लंड संघात झाला होता. तसेच या स्टेडीयमवर शेवटचा सामना 3 नोव्हेंबर 2005ला भारत विरुद्ध श्रीलंका संघात झाला.
वाचा –
पॉंटिंगच्या नजरेत भरला म्हणून भारतासाठी खेळला; वाचा अशोक डिंडाच्या आयपीएल एन्ट्रीची शानदार कहाणी