आयपीएल 2021 मधील 13 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात दोन्हा संघांनी आपल्या अंतिम अकरामध्ये बदल केलेला दिसला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने अमित मिश्राला संघात स्थान दिले होते; तर मुंबई इंडियन्सने जयंत यादवला खेळण्याची संधी दिली होती.
दिल्ली संघात डाव्या हाताचे फलंदाज असल्याने जयंत यादवला संघात स्थान देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, बाकी सामन्यात बाकावर बसणाऱ्या या खेळाडूला दिल्लीविरुद्ध मात्र संघात स्थान देण्यात येते. कारण बऱ्याचदा तो दिल्लीच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला आहे.
आयपीएल 2020 मध्येही त्याने फक्त दोन सामने खेळले होते आणि दोन्ही सामने त्याने दिल्लीविरुद्ध खेळले होते. या दोन सामन्यात त्याला एकच बळी मिळवता आला. परंतु त्याच्या गोलंदाजी समोर दिल्लीच्या फलंदाजांना वेगाने धावा करता आल्या नाहीत. पहिल्या सामन्यात त्याने तीन षटके टाकली त्यामध्ये त्याने 18 धावा दिल्या. परंतु त्याला एकही बळी मिळला नाही. त्यानंतर जेव्हा त्याला अंतिम सामन्यात संधी मिळाली. तेव्हा त्याने चार षटकांत 25 धावा देऊन एक बळी घेतला आणि हा शिखर धवनचा बळी होता. त्यावेळी धवन चांगली कामगिरी करत होता. परंतु जयंतने त्याला 15 धावांवरती बाद करून त्याची खेळी संपवली होती.
यापूर्वी आयपीएल 2019 मध्येही दिल्लीविरूद्ध मुंबईने त्याला मैदानात उतरवले होते. यावेळीही त्याने एका सामन्यातील चार षटकांत 25 धावा दिल्या, परंतु त्याला बळी मिळवता आला नाही.
मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्याअगोदर तो दिल्ली संघाचा भाग होता. 2014 मध्ये दिल्लीने त्याला 1 कोटी रुपयांत विकत घेतले होते. एक हंगाम बाकावर बसल्यानंतर 2015 ते 2017 दरम्यान, त्याने 10 सामने खेळताना 4 बळी घेतले होते. त्यानंतर पुन्हा आयपीएल 2018 मध्ये पूर्ण हंगामात संधी न मिळाल्यानंतर आयपीएल 2019 मध्ये मुंबईने त्याला 5 कोटी रुपयांत ट्रेड केले होते. तेव्हापासून तो या संघाचा भाग आहे.
31 वर्षीय जयंत यादव ऑफ स्पिनर खेळाडू असून तो हरियाणाकडून घरेलू क्रिकेट खेळतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 61 सामन्यांत 162 बळी घेतले आहेत. घरगुती क्रिकेटमधील शानदार कामगिरीमुळे 2016 साली त्याची भारतीय कसोटी संघात निवड झाली होती. त्याने विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने चार गडी बाद करून 62 धावा केल्या होत्या. त्यानंतर मोहाली येथेही पुढच्या कसोटी सामन्यात त्याने 4 बळी घेत 55 धावा केल्या होत्या. मुंबईत इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटीत त्याने शतक झळकावले होते. कसोटीत नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शतकी खेळी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मिश्राजींपुढे मुंबईचे लोटांगण, भल्याभल्या फलंदाजांच्या ‘अशा’ चटकावतो विकेट्स; स्वत:च केला उलगडा
हे पोरगं भारीय! नाणेफेकीवेळी रिषभने रोहितला केल्या गुदगुल्या; Video पाहून व्हाल लोटपोट