महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकर या स्टार भारतीय पुरुष क्रिकेटर्सच्या जीवनावरील चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता भारतीय महिला संघातील स्टार वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या जीवनावरही एक चित्रपट बनवण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमधील झुलन ही सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.
यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे जीवन मोठ्या पाड्यावर आणण्यात आले होते. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी नुकत्याच झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात धडक मारून संपूर्ण भारताचे लक्ष महिला क्रिकेटकडे वळवले होते. पण दुर्दैवाने, लॉर्ड्सवरील अंतिम लढतीत भारताला इंग्लंडने ११ धावांनी मात दिली. झुलान गोस्वामीने पहिल्या सामन्यापासूनच गोलंदाजीमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे आणि संघाच्या यशामध्ये तिचा मोठा वाटा राहिला आहे.
चित्रपटाचे नाव – चाकदह एक्सप्रेस !
झुलनवरील बायोपिकला तात्पुरते ‘चाकदह एक्सप्रेस’ असे नाव देण्यात आले आहे. या चित्रपटात नादिया जिल्ह्यातील छोट्या गावापासून ते क्रिकेटची पांढरी लॉर्ड्समध्ये खेळलेल्या विश्वचषकच्या अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
हा चित्रपट हिंदीमध्ये तयार करण्यात येणार आहे आणि बंगालचे सुशांत दास हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. त्यांच्या मते, चित्रपटाचे पटकथा लिहण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे आणि पुढील वर्षी एप्रिलमध्ये शूटिंग सुरू होईल.
“शूटिंग चकदाहापासून ते लॉर्डस् पर्यंत होणार आहे,” असे दास यांनी सांगितले. त्यांनी असे ही सांगितले की, बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींना झुलनची आव्हानात्मक भूमिका निभावण्यासाठी निवडण्यात आले आहे पण अजून काही फायनल नाही. “मी आताच तुम्हाला नाव सांगू शकत नाही पण आम्ही बॉलिवूडमधील काही अभिनेत्रीशी चर्चा करीत आहोत, “असेही ते म्हणाले.
सुशांत दास आशा करतात की चित्रपट पाहून देशातील आगामी क्रिकेटर्सना प्रेरणा मिळेल. “आम्ही महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकरचे बायोपिक्स पाहिले आहेत. पण महिला क्रिकेटमध्ये हा पहिला बायोपिक असेल. आम्ही आमच्या टीमला झुलन जिथे जिथे खेळली आहे तेथे तेथे पाठवू. चित्रपटाचा केंद्रबिंदू तिचा अविस्मरणीय प्रवास दाखवणे असेल. यामुळे लाखो युवा खेळाडूंना प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल व ते आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतील, ” असे ते म्हणाले.