प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी डिफेंडर आणि या मोसमामध्ये जयपूर पिंक पँथर्स संघाचा कर्णधार मंजीत चिल्लर याच्या नावावर डिफेन्समधील एक मोठा विक्रम होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मोसमात बेंगलूरु बुल्ससाठी खेळणारा मंजीत तिसऱ्या आणि चौथ्या मोसमात पुणेरी पलटण संघासाठी खेळाला. पुणेरी पलटण संघाने त्याच्या ऐवजी दीपक निवास हुड्डा याला संघात कायम करून कबड्डी विश्वाला धक्का दिला होता.
डिफेन्समध्ये बॅक होल्ड आणि फ्रंट ब्लॉकसाठी मंजीत ओळखला जातो. त्याचे रेडींगमधील कौशल्यही जगविख्यात आहे. संघाला गरज असेल तेव्हा रेडींगमध्येही तो गुण मिळवून देण्याची क्षमता ठेवतो. या दोन्ही आघाड्यांवर उत्तम कामगिरी करू शकत असल्याने तो प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी ऑलराऊंडर आहे. राहुल चौधरी, अनुप कुमार आणि काशीलिंग आडके यांच्यानंतर एकूण गुणांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे.
मंजीतच्या नावावर आगामी सामन्यात होऊ शकणाऱ्या विक्रमावर नजर टाकू. मंजीतच्या नावावर ६० सामन्यात ४०४ गुण आहेत ज्यापैकी रेडींगमध्ये २०७ तर डिफेन्समध्ये १९७ गुण आहेत. आगामी सामन्यात जर त्याने डिफेन्समध्ये ३ गुण मिळवले तर तो प्रो कबड्डी इतिहासात डिफेन्समध्ये २०० गुणांची कमाई करणारा पहिला खेळाडू ठरेल. त्याचबरोबर तो प्रो कबड्डीमधील रेडींग आणि डिफेन्समध्ये २०० – २०० गुण मिळवणारा पहिला खेळाडू बनेल.