मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २६ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिजचा दुसरा कसोटी सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने मात केली. यासह मालिकेत १-१ ने बरोबरी झाली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काही क्रिकेट रसिकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्या उपस्थित क्रिकेट रसिकांपैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. मेलबर्न क्रिकेट क्लबने बुधवारी (०६ जानेवारी) यासंदर्भात माहिती दिली आहे.
मेलबर्न क्रिकेट क्लबने सांगितले की, “भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या एका चाहत्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे २७ डिसेंबर रोजी १२.२० ते ०३.३० या वेळेमध्ये स्टेडियमच्या द ग्रेट सदर्न स्टँडच्या झोन ५ मध्ये बसलेल्या सर्व क्रिकेट रसिकांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच तुमचे कोरोना अहवाल येईपर्यंत एकमेकांपासून दूर राहावे.”
बॉक्सिंग डे सामना पाहण्यासाठी आलेला चाहता कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने येत्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या सुरक्षेसंदर्भात कठोर निर्णय घेतले आहेत. ईएसपीएन क्रिकइन्फोमधील एका वृत्तानुसार, न्यू साउथ वेल्स सरकारने सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या सामन्यादरम्यान दर्शकांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे. तसेच स्टेडियममध्ये ५० टक्केऐवजी केवळ २५ टक्के दर्शकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
सिडनीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे ठिकाण संभ्रमात होते. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया हा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे ठराविक वेळापत्रकानुकार ७ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत सिडनी येथे तिसरा कसोटी सामना होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हा’ गोलंदाज करणार पदार्पण
अजिंक्य रहाणेसाठी डोकेदुखी, शार्दुल आणि सैनीपैकी कोणाची करावी निवड?
ऑस्ट्रेलिया-भारत पडले मागे; न्यूझीलंड कसोटीचा नवा किंग