भारतात होणाऱ्या फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात खूप पूरक वातावरण तयार झाले आहे. या स्पर्धेमुळे भारतात फुटबॉल खेळाच्या विकासाला खूप चालना मिळणार आहे. फुटबॉल लीगबद्दल बोलायचे झाले तर भारतात इंडियन सुपर लीग आणि आय लीग खूप प्रसिद्ध आहेत. त्यातही इंडियन सुपर लीग आणि त्यातील वलय खूप आहे. या स्पर्धेला मिळणार प्रतिसाद आणि जगभरातील फुटबॉल क्षेत्रातील आजी माजी मोठे खेळाडू यामुळे ही स्पर्धा पहिल्या मोसमापासून लोकप्रियतेचे केंद्र आहे. याच बरोबर मागील वर्षांपासून भारतात एक नवीन फुटबॉल लीग सुरु झाली आहे ती म्हणजे प्रीमियर फुटसॉल लीग.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा फुटसाल प्रकारातील स्पर्धा आहे. या स्पर्धेशी फुटबॉलमधील काही महान खेळाडू जोडलेले आहेत. या स्पर्धेची कल्पना पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू लुईस फिगो आणि ब्रॅझिलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो यांची आहे. या स्पर्धेशी काही अन्य महान खेळाडू जोडले आहेत ते म्हणजे रायन गिग्स, पॉल शोल्स, रायन गिग्स, मायकल सलगाडो, डेको, फाल्को आणि ब्राझिलियन महान खेळाडू काफ़ू.
ही स्पर्धा जरी फुटबॉल या खेळचीच असली तरी या स्पर्धेचे स्वरूप आणि नियम वेगळे आहेत . ते कोणते आहेत हे आपण जाणून घेऊ –
#१ फुटसाल हे इंडोर स्टेडियममध्ये खेळले जाते. फुटबॉलच्या बाकीच्या लीग किंवा सामने सहसा खुल्या मैदानात खेळले जातात.
#२ फुटसालमध्ये प्रत्येक संघात पाच खेळाडू असतात. तर फुटबॉलमध्ये एका संघात ११ खेळाडू असतात.
#३ फुटबॉलमध्ये एकूण तीन वेळा आपण बदली खेळाडू म्हणजे सब्स्टीट्युट करू शकतो. फुटसालमध्ये तुम्ही कितीही वेळा खेळाडू बदलू शकता. याला फुटसालमध्ये ‘रोलींग सब्स’ असे संबोधले जाते.
#४ फुटबॉल सामन्यांमध्ये मैदानावरील गवत आणि पाणी यामुळे खेळाडू घसरून पडू नये म्हणून खेळाडूंना खास प्रकारचे खिळे असलेले बुट घालावे लागतात . तर फुटसालचे सामने इंडोर स्टेडियममध्ये असल्याने त्यांना तश्या खास बुटांची गरज नसते . या खेळातील खेळाडू फ्लॅट बूट वापरतात.
#५ फुटबॉलमध्ये असणारा ऑफसाइडचा नियम फुटसालमध्ये वापरला जात नाही.
#६ फुटबॉलमध्ये बॉलची साईज ५ असते. तर फुटसालमध्ये बॉलची साईज ४ असते.
#७ फुटबॉलमध्ये बॉल मैदानाबाहेर गेला तर तो बॉल मैदानात हातानेमध्ये फेकला जाते. त्याला फुटबॉलमध्ये ‘थ्रो- इन’ असे म्हणतात. फुटसालमध्ये बाहेर गेलेला बॉल आतमध्ये पायाने मारावा लागतो त्याला ‘किक इन’ म्हणतात.
#८ फुटबॉलमध्ये एखाद्या खेळाडूला जर रेड कार्ड दिले तर त्याला त्या सामन्यातून बाहेर जावे आणि त्याला यापुढील एक सामन्याला देखील मुकावे लागते. त्या संघाला त्याच्या बदलात अन्य एखादा खेळाडू संघात घेता येत नाही. एका कमी खेळाडूंनीही खेळावे लागते. फुटसालमध्ये जर एखाद्या खेळाडूला रेडकार्ड दिले गेले तर दोन मिनिटांनी एखादा खेळाडू त्याच खेळाडू ऐवजी सामन्यात येऊ शकतो.