fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

प्रिय एबी, क्रिकेटला परिपुर्ण बनवल्याबद्दल थँक्यू !!

-प्रणाली कोद्रे ( [email protected] )

प्रिय एबी,

एबी, तुझ्या नावातच काय जादू आहे रे, जेव्हाही तूझं नाव ऐकते तेव्हा तूझी अफलातून फटकेबाजी आठवते. तू फक्त आक्रमक फटके मारतो म्हणून नाही तर तूझ्या फटक्यात जी काही नजाकत असते ती इतकी भारी आहे असते की अगदी कोणीही भारावून जाईल. तूझ्या वेगळ्याच शैलीने गेली 14 वर्षे तू आम्हा चाहत्यांना भूरळ घातली आहेस.

असं असतानाच तू काल अचानक सांगून टाकलसं ‘आता थांबायची वेळ आली आहे. मी आता थकलो आहे. आता दुसऱ्यांना संधी देऊयात.’ त्यावेळी खरंच धक्का बसला. धक्का म्हणण्यापेक्षा काही क्षण इतके स्तब्धतेत गेले की कळलंच नाही, जे ऐकलं किंवा जे पाहिलं ते खरं आहे का? खरंच आम्ही तुला यापूढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना नाही पाहू शकणार का?

अरे, तुला खेळताना पाहणं म्हणजे आम्ही क्रिकेटमधलं सुख समजतो आणि तू किती सहज आणि शांततेत सांगितलं की तू निवृत्त होतोय. तुझी फलंदाजी जशी आक्रमकतेने बोलते त्यापेक्षा कितीतरी शांततेत तू तुझ्या निवृत्तीचा निर्णय सांगितला. कसलाही गाजावाजा न करता. एबी, तू खरंच खूप लवकर निवृत्तीचा निर्णय घेतलास. खरंतर ही तुझी सवयच आहे, हो ना? तू क्रिकेटमध्ये सगळंच वेगवान केलंस, मग ते जलद अर्धशतक असो, जलद शतक असो किंवा जलद दीडशतक असो. पण म्हणून तू निवृत्तीही इतक्या लवकर घ्यावी अशी आमची अपेक्षा नव्हती रे. तुझा हा निर्णय आम्हाला चटका लावून गेला.

मी एक भारतीय चाहती आहे तुझी. भारतीय आहे हे सांगण्याचा उद्देश असा की तू भारतातला सर्वात लाडका परदेशी खेळाडू आहेस. तू जरी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू असला तरी आम्ही तुला ‘आपला एबी’ असच म्हणतो. माहित नाही का, पण तू आम्हाला कधीच वेगळा वाटलं नाहीस. तू भारताविरुद्ध जरी खूप चांगला खेळाला तरी तुझा कधी तिरस्कार वाटला नाही. मी तर बऱ्याचदा म्हणते, की भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकावा पण तरीही एबीने मस्त खेळावं. त्याची ती फलंदाजी बघायला मिळावी.

तुझी चेहऱ्यावरची शांतता कायमच आमच्या लक्षात राहिल . आम्ही भारतीय तुझ्या विषयी बोलताना किंवा तुझं नाव घेताना आपलेपणाने घेतो, म्हणजे जर आम्हाला तू चांगला खेळला अस जरी म्हणायचं असेल तरी आम्ही ‘आपला एबी काय भारी खेळला’ असं सहज म्हणतो. कारण तू आमच्यासाठी वेगळा नाहीच आहे. खरंतर फक्त आम्हीच तुझ्यावर प्रेम करतो असे नाहीये तर तुही आम्हा भारतीयांना तेवढंच प्रेम दिल आहेस. म्हणूनतर तू तुझ्या पत्नीला लग्नाची मागणी घातली तीही भारतात ताजमहालच्या समोर. आपलं नात म्हणूनच कदाचित वेगळं आहे.

त्यात आयपीएलने ते आणखी घट्ट केलं आहे.  तू रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत जी जादू भारतीय प्रेक्षकांवर केलीस तशीच खेळाडूंवरही केलीस. म्हणूनच काल अनेक भारतीय खेळाडूंनी तुझ्या निवृत्ती बद्दल हळहळ व्यक्त केली. तू म्हणतो क्रिकेट सिम्पल खेळ आहे. जस तू म्हणाला तस तू केलसही. तू ज्या मैदानावर तुझ्या कारकिर्दीतला पहिला सामना खेळला त्याच मैदानावरून तू निवृत्ती घोषित केलीस इतकं तू तुझं क्रिकेट साधं ठेवलं. तू खरचं ग्रेट आहेस.

आम्ही जेव्हाही आयपीएलमध्ये बेंगलोरचे सामने पाहतो त्याचं मुख्य कारणच तुझी आणि विराटची फलंदाजी बघणे हे होत. तू फक्त आयपीएलमध्येच नाही तर क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात जी काही गोलंदाजांची धुलाई करतो आणि तेही तुझ्या खुमासदार शैलीने 360 डिग्रीमध्ये. ते पाहिलं की अंगावर रोमांच उभे राहतात. तुझी फलंदाजीच इतकी भारी असते की गोलंदाजांनाही त्यांना मार पडल्याचं वाईट वाटत नसावं.

काहीजण म्हणतात तू मर्यादित षटकांचा खेळाडू आहेस. पण माझ्यासाठी तू कोणत्याही प्रकारात खेळालास तरी तू भारीच आहेस. त्याच कारण थोडं वेगळं आहे. 2015 मध्ये जेव्हा द. आफ्रिका संघाने भारताचा दौरा केला होता तेव्हा तू चांगला खेळला होताच, पण त्याहीपेक्षा तुझा अभिमान तेव्हा वाटला होता जेव्हा तू चौथ्या कसोटीत शेवटच्या दिवशी भारताचा विजय जवळ जवळ निश्चित झालेला असतानाही ज्या प्रकारे तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध फलंदाजी केली. तिथेच तू आमची मने जिंकली होती. तुझ्यासारख्या फलंदाजांने कोठेही आशा न सोडता 297 चेंडूत फक्त 43 धावा करत तुझ्या संघाचा पराभव टाळण्यासाठी जी लढत दिलीस त्याच दिवशी मानलं मी तुला. त्यादिवशी मला भारत जिंकल्याचा आनंद होता पण त्यापेक्षा तुझं कौतुक जास्त वाटत होतं. त्यादिवशी तू मला शिकवल आपल्याला सगळं येत अशा भ्रमात न राहता परिस्थिती बघून वागावं. आपले प्रयन्त खरे असतील तर कौतुक होण्यासाठी गाजावाजा करण्याची गरज नसते.

2019 चा विश्वचषकाला 1 वर्षच राहिल असताना तूझी हा निस्वार्थी निर्णय आला. 2015 च्या विश्वचषकावेळी द. आफ्रिकेच आव्हान संपले पण त्यावेळी तूझे आश्रू खूप काही सांगून गेले. काही दिवसांपूर्वीच तू ” विश्वचषक जिंकणे हे माझे अंतिम स्वप्न नाही,” असे वक्तव्य करून निवृत्तीचे संकेत दिले होते. पण तरीही कोणालाही कल्पना नव्हती तू हा निवृत्तीचा निर्णय इतक्या लवकर आणि असा अचानक निवृत्ती घोषित करशील.

कधी कधी प्रश्न पडतो असं काय आहे जे तूला क्रिकेटमध्ये येत नाही. तुला उत्तम यष्टीरक्षण जमतं, तू अफलातून फलंदाजी करतोस, तू क्षेत्ररक्षणात सुपरमॅन आहेस.तूला सगळचं जमतं म्हणूनच तूला आणखी खेळताना पाहायचं होतं. पण तू निवृत्ती घेतली. तूझ्या निर्णयाला चुकीचं म्हणणार नाही. पण म्हणतात ना माणसाच्या ईच्छा कधी संपत नाहीत. कदाचीत तूझ्याबाबतीत आमचं असचं झाल.

असो, एबी तूझ्यासारखा खेळाडू पून्हा क्रिकेटला भेटेल की नाही माहित नाही. पण तू मात्र कायम आमच्या लक्षात रहाशील. तू ज्या आठवणी दिल्यास, तू आम्हाला क्रिकेट पाहाताना जो आनंद दिला त्याबद्दल खरचं थँक्यू एबी.

तूझी, एक चाहती

You might also like