भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू आहे. रविवारी (27 डिसेंबर) या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी करत नाबाद शतक झळकावले आहे. अजिंक्यच्या या शतकी खेळीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पहिल्या सामन्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर नव्या जोशात भारतीय संघ मैदानात उतरला. यावेळी अजिंक्यने त्यात मोठे योगदान दिले आहे. अजिंक्यने आपल्या खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. अजिंक्य हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दोन किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी शतक करणारा दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.
रविवारी केलेले कसोटी शतक हे अजिंक्यचे मेलबर्न येथे केलेले दुसरे शतक आहे. यापुर्वी 2014 साली त्याने 147 धावांची शानदार खेळी केली होती. त्याने त्या सामन्यात विराटसोबत उत्तुंग भागीदारी केली होती. अजिंक्यने केवळ 171 चेंडूतील 147 धावांच्या खेळीत तब्बल 21 चौकारांची आतषबाजी केली होती.
अजिंक्यपूर्वी केवळ विनू मंकड यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर एकापेक्षा जास्त शतके केली आहेत. मंकड हे भारतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानले जातात. त्यांनी 1948 ला मेलबर्न येथे शतके केली होती. त्यावेळी त्यांनी 116 आणि 111 धावांची खेळी केली होती.
अजिंक्यने आपल्या शतकी खेळीत आणखी एक महत्वाचा विक्रम आपल्या नावे केला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय कर्णधाराने केलेले हे केवळ दुसरे शतक आहे. यापूर्वी 1999 साली सचिन तेंडुलकर कर्णधार असताना त्यांनी मेलबर्न येथे शतक केले होते. त्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर एखाद्या भारतीय कर्णधाराला मेलबर्न येथे शतक करण्यात यश आले आहे.
अजिंक्यने आपल्या 104 धावांच्या नाबाद खेळीत 12 चौकार लगावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अजिंक्य रहाणेला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा स्लेजिंगचा वापर? बघा व्हिडिओ
दुसरा कसोटी सामना जडेजासाठी फारच खास, जाणून घ्या कारण