सोमवार रोजी (२६ ऑक्टोबर) अफगानिस्तानच्या संघाने शारजाहच्या मैदानावर विक्रमी विजयाची नोंद केली. फलंदाजी आणि गोलंदाजीत अप्रतिम खेळ दाखवत त्यांनी प्रतिस्पर्धी स्कॉटलँडवर १३० धावांनी मात केली. या सामन्यादरम्यान अफगानिस्तानच्या डावखुऱ्या फलंदाज नजीबुल्लाह जदरान याने १७३ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत सामना दर्शकांचे पैसावसूल मनोरंजन केले. आपल्या ताबडतोब अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने काही आकर्षक शॉटही खेळले. मात्र गोलंदाज मार्क वॅटच्या चेंडूवर त्याने जडलेला एकमेव षटकार सर्वांच्या पसंतीस उतरताना दिसतो आहे.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगानिस्तान संघाचा डाव सुरू असताना स्कॉटलँडचा गोलंदाज मार्क १८ वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने आपल्या या षटकातील पाचवा चेंडू वाईड यॉर्कर टाकला. यावर नजीबुल्लाहने वाईड लाँग ऑफच्या दिशेने खणखणीत षटकार खेचला. त्याने मारलेल्या या चेंडूने सीमारेषा तर पार केलीच सोबतच सीमारेषेबाहेर ठेवलेल्या फ्रिजच्या दरवाज्याच्या काचाही चक्काचूर केल्या.
त्याच्या या शॉटचे सामना समालोचकांनीही कौतुक केले. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल अर्थात आयसीसीनेही त्याचा हा व्हिडिओ शेअर करत त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
https://www.instagram.com/reel/CVdVU4wlvcZ/?utm_source=ig_web_button_share_sheet
नजीबुल्लाहने स्कॉटलँडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. अफगानिस्तानच्या सलामीवीरांनी दहाव्या षटकापर्यंत संघाच्या ८२ धावा फलकावर लावल्या होत्या. सलामीवीरांची जोडी पव्हेलियनला परतल्यानंतर नजीबुल्लाहने ती लय कायम राखली. त्याने ३४ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ५ चौकार ठोकत ५९ धावांची तडखाफडकी खेळी केली. २० व्या षटकाच्या अगदी शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.
परंतु त्याच्या या खेळीमुळे अफगानिस्तानचा संघ स्कॉटलँडला १९१ धावांचे मोठे आव्हान देऊ शकला. प्रत्युत्तरात अफगानिस्तानचे गोलंदाज मुजीब उर रेहमान आणि राशिद खान यांनी गोलंदाजीची जबाबदारी चोखपणे पार पाडत संघाला विजय मिळवून दिला. त्यांनी अनुक्रमे ५ आणि ४ विकेट्स घेत स्कॉटलँडला केवळ ६० धावांवर रोखले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा’, म्हणणारे रमीज राजा ट्रोल; नेटकरी म्हणाले, चुना लगा गया रे!
आजपर्यंत टी२० मध्ये कधीही न केलेली ‘अशी’ नकोशी कामगिरी स्कॉटलंडने केली अफगाणिस्तानविरुद्ध
तीन टी२०, ५ दिवस अन् १५ मिलीयन डॉलर बक्षीस! पीटरसनने भारत-पाकिस्तान मालिकेबद्दल मांडली अनोखी कल्पना