भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याला ७ जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात झाली. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांची मजल मारली. या धावसंख्येच्या प्रत्युतरात दुसऱ्या दिवसाखेर भारताने ४५ षटकांत २ बाद ९६ धावा केल्या आहेत.
मात्र दुसऱ्या दिवशी मैदानातील एका अजब घटनेने लोकांचे लक्ष वेधून घेतले. हा सामना पाहायला आलेला एक चाहता प्रेक्षकांसाठी असलेल्या खुर्च्यांवर चक्क झोपलेला आढळला. हा फोटो एका व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच चेतेश्वर पुजाराच्या संथ फलंदाजीला कंटाळून हा चाहता बहुधा झोपी गेला असावा, असा मजेशीर तर्क देखील लावला आहे. या पोस्टवर अनेकांनी अशाच आशयाच्या कमेंट्सही केल्या आहेत. परंतु काही जणांनी मात्र या चेष्टेचा विरोध करत पुजाराला त्याच्या पद्धतीने खेळू द्या, अशी मागणीही केली आहे.
https://twitter.com/FarziCricketer/status/1347434080774758404
दरम्यान, पुजाराच्या दुसऱ्या दिवसाच्या फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास दिवसाखेर तो ९ धावांवर नाबाद आहे. मात्र या ९ धावांसाठी त्याने तब्बल ५३ चेंडू खेळून काढले आहेत. अशा प्रकारच्या संथ फलंदाजीबद्दल त्याच्यावर यापूर्वीही टीका झाली आहे. मात्र आपल्या तंत्रावर आणि पद्धतीवर पुजारा ठाम राहिला आहे. त्याच मार्गाने त्याने यश देखील मिळविले आहे. त्यामुळे सिडनी कसोटीतही पुजाराने कुठल्याही मार्गाने का होईना, पण मोठी खेळी उभारावी आणि भारतीय संघाला विजयाच्या दृष्टीने मजबूत स्थितीत न्यावे, अशीच समस्त भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.
महत्वाच्या बातम्या:
चीते की चाल, बाज की नजर और जडेजा की थ्रो पे कभी संदेह नहीं करते
आयडियाची कल्पना! लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवताना हँडेलवर फुंकर घातल्याचं हे होतं कारण
विमान कोसळलं! हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या नादात राशिद गोल्डन डक; समालोचकांनाही आवरेना हसू