बारामती। दिनांक ३० नोव्हेंबर व ०१ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय सायकल स्पर्धा रोड रेस प्रकारात जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, स्पोर्ट्स अकॅडमी बारामती, न्यू बारामती सायकल क्लब, बारामती सायकल क्लब, बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन, बारामती कराटे असोसिएशन, बारामती सायकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या तांत्रिक सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील ८ विभाग व क्रीडा प्रबोधनी असे १४/१७/१९ वयोगटातील संपूर्ण महाराष्ट्रातुन ३०० खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धा प्रमुख आयोजक दादासो आवाड यांनी दिली आहे. स्पर्धा पूर्व रस्ता व खेळाडू निवासव्यवस्था पाहणीसाठी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान,तालुका क्रीडा अधिकारी खेड राजेश बागुल, तालुका क्रीडा अधिकारी बारामती जगन्नाथ लकडे, सायकल या क्रीडा प्रकारच्या राज्य मार्गदर्शिका दिपाली पाटील, स्पोर्ट्स अकॅडमीचे अजिनाथ खाडे, मोहन कचरे, दत्ता चव्हाण, अक्षय खोमणे, बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक रविंद्र करळे,अभिमन्यू इंगुले आदी उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी दिनांक १ डिसेंबर रोजी पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स ते पेन्सिल चौक एमआईडीसी मुख्य रस्ता सकाळी ६.०० ते १२.०० या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने यावेळेत सर्व्हिस रोड वापरण्याचे आवाहन सर्व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.