जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. या सामन्याला आठवडाभराचा कालावधी उलटून गेल्यानंतरही अनेक माजी क्रिकेटपटू यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. भारताचा माजी सलामीवीर व सध्या समालोचक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आकाश चोप्रा याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्यासह विद्यमान कर्णधार विराट कोहली याची तुलना केली आहे. तसेच, त्याने मोठ्या स्पर्धांच्या बाद फेरीत भारतीय संघाला पराभूत का व्हावे लागत आहे, याचे कारण देखील सांगितले.
आकाश चोप्राने सांगितला कर्णधारांमधील फरक
आकाश चोप्रा हा सध्या समालोचक म्हणून बराच प्रसिद्ध झाला आहे. यासोबतच तो आपल्या यूट्यूब चॅनलवरून देखील आपली मते व्यक्त करत असतो.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली व भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याची तुलना करताना तो म्हणाला, “धोनीचा दर्जा वेगळा होता. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकल्या कारण तो खेळाडूंमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करत. अशा मोठ्या स्पर्धांत तो संघामध्ये मोठे बदल करत नसायचा. पहिल्या सामन्यापासून अखेरच्या सामन्यापर्यंत त्याची प्लेइंग इलेव्हन जवळपास एकसमान असत. त्या संघामध्ये अनेक मॅचविनर खेळाडू दिसून येत. मोठ्या स्पर्धा तोच संघ जिंकतो जो कमी चुका करतो.”
आकाश चोप्रा याने यादरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचादेखील उल्लेख केला.
विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ ठरतोय अपयशी
विराट कोहलीने भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून संघाला एकाही आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, २०१९ विश्वचषकाचा उपांत्य सामन्यात व आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला.
दुसरीकडे, एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्व प्रकारच्या आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केल्या. २००७ टी२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक व २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीच्या नेतृत्वात भारताने जिंकल्या आहेत. धोनीच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर देखील पोहोचला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मित्रांसह युरो कप २०२० चा सामना पाहायला गेला रिषभ पंत, पण ‘या’ कारणामुळे चाहत्यांनी केले ट्रोल
खुशखबर! भारतीय महिला गोल्फपटू आदिती अशोक टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
रोड टू टोकियो! भारताच्या ‘या’ दोन जलतरणपटूंनी मिळवली ऑलिंपिकची पात्रता