बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं घेतलेले काही निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते. आता माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी आर अश्विनला दुसऱ्या डावात गोलंदाजीची कमी संधी दिल्यावरून तिखट प्रश्न विचारले आहेत.
दुसऱ्या डावात न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचं किरकोळ लक्ष्य होतं. हे गाठण्यासाठी त्यांनी सुमारे 28 षटकं खेळली. परंतु या काळात आर अश्विनला केवळ 2 षटकं मिळाली. हीच बाब आकाश चोप्राला सतावत असून त्यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाले, “धावा कमी होत्या यात शंका नाही, पण आपण अश्विनला अजिबात गोलंदाजी दिली नाही. मी असं म्हणत नाही की जर अश्विननं गोलंदाजी केली असती तर आपण सामना जिंकला असता, पण आपण त्याला गोलंदाजीच दिली नाही, हे आश्चर्यकारक होतं. अश्विनला गोलंदाजी का दिली नाही, याचं उत्तर माझ्याकडे नाही. कारण त्याची आकडेवारी पाहिली, तर त्याच्यापेक्षा जास्त विकेट्स कोणीही घेतल्या नाहीत. पण तरीही तुम्ही त्याला गोलंदाजी दिली नाही, हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे”
आकाश चोप्रा यांनी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवला अश्विनच्या आधी गोलंदाजी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. ते म्हणाले, “तुम्ही बुमराहचा दीर्घ स्पेल समजू शकता. दुसऱ्या टोकानं मोहम्मद सिराज गोलंदाजी करत होता. तुम्ही जेव्हा त्याला हटवलं, तेव्हा तुम्ही अश्विन किंवा जडेजाला आणू शकले असता. मात्र तुम्ही कुलदीपला आणलं. अश्विन तुमच्यासाठी पाचवा गोलंदाज होता. तो जेव्हा गोलंदाजीला आला, तेव्हा सामन्यात काहीच शिल्लक नव्हतं. त्यांना जिंकण्यासाठी फक्त 15 किंवा 20 धावा करायच्या होत्या. येथे अश्विनला गोलंदाजी का दिली नाही, हे मला समजलेलं नाही”.
हेही वाचा –
कागिसो रबाडानं रचला कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा रेकॉर्ड; डेल स्टेन, वकार युनूससारख्या दिग्गजांना टाकलं मागे
टीम इंडियाबाहेर असलेला हा खेळाडू ठोकतोय शतकावर शतकं! ब्रायन लाराचा विक्रमही मोडला
चॅम्पियन्स ट्रॉफीचं काय होणार? बीसीसीआयनं पाकिस्तानचा हा प्रस्ताव धुडकावला! संपूर्ण प्रकरण जाणून घ्या