इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये अनेक खेळाडू रिटेन केले गेले. या खेळाडूंकडून संघाला खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांना खास कामगिरी करता आली नाही. या यादीत सामील आहे चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा होय. जडेजाच्या खराब फॉर्मबद्दल भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्यानुसार, जडेजाला चेंडू आणि बॅटमधून खास कामगिरी करता येत नसल्याने संघाचे खूप नुकसान झाले आहे.
या हंगामात रवींद्र जडेजा याने (Ravindra Jadeja) आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. त्यात त्याने १९.३३च्या सरासरीने ११६ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, गोलंदाजी करताना त्याने ७.५२च्या इकॉनॉमी रेटने फक्त ५ विकेट्स घेतल्या आहेत. यावरून त्याची निराशाजनक कामगिरी दिसते. खराब कामगिरीमुळे त्याने ८ सामन्यांनंतर हंगामाच्या सुरुवातीला मिळालेली कर्णधारपदाची जबाबदारीही सोडली होती.
युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा (Aakash Chopra) म्हणाला की, चेन्नईची फलंदाजी रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांच्यावर अवलंबून आहे. दुसरीकडे जडेजाच्या फॉर्मनेही सर्वाधिक नुकसान पोहोचवले आहे. तो म्हणाला की, “शेवटच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीवर बाद झालेल्या उथप्पा आणि रायुडूची सीएसकेसाठी अडचण होती. ते या दोघांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतील, पण मुख्य अडचण रवींद्र जडेजाची आहे. त्याने ना धावा केल्या ना विकेट्स. शेवटच्या सामन्यात तो किफायतशीर होता, पण त्याला विकेट मिळाली नव्हती.”
‘दिल्लीच्या विजयासाठी रिषभ पंतला मोठी खेळी करावी लागेल’
दिल्ली कॅपिटल्सला मागील सामन्यात विजय मिळाला होता. मात्र, या सामन्यात विजयासाठी आकाश चोप्राने कर्णधार रिषभ पंतची फलंदाजी महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे. त्याच्या मते, विरोधी संघाचे फिरकीपटू इतर फलंदाजांसाठी धोकादायक ठरत आहेत. मात्र, पंत तो धोका कमी करू शकतो. चोप्रा म्हणाला की, “मनदीपच्या जागी पृथ्वी शॉ उपलब्ध झाल्यास तो थेट संघात परतेल. तुमच्याकडे अक्षरचा योग्य पर्याय नाही, त्यामुळे त्याची कमतरता जाणवेल. मात्र, दिल्लीला हा सामना जिंकायचा असेल, तर रिषभ पंतला मोठी खेळी खेळावी लागेल. कारण चेन्नई फिरकीची योजना घेऊन येणार आहे.”
मागील सामन्यात पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेल यांना खेळता आले नव्हते. कदाचित या सामन्यात त्यांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तरीही, याबाबत अजूनही संघ व्यवस्थापनाकडून कोणतीही माहिती आलेली नाहीये.
चेन्नई विरुद्ध दिल्ली संघात रविवारी (दि. ०८ मे) आयपीएल २०२२मधील ५५ सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्लीला प्लेऑफमधील शर्यतीत टिकून राहण्यासाठी विजय मिळवावा लागणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयरथावर स्वार राजस्थान रॉयल्सला झटका, अर्ध्यातून मॅच विनर फलंदाजाची घरी रवानगी
कोलकाताचं चुकलं कुठं? लखनऊविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं कारण
सात सामन्यांनंतर पुनरागमन करताना जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय






