इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा थरार सध्या संयुक्त अरब अमिराती येथे सुरु आहे. अशातच काहीदिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने जाहीर केले आहे की या हंगामानंतर तो संघाचे कर्णधारपद सोडेल. आता अशा परिस्थितीत आरसीबीसमोर कोणाला कर्णधार बनवायचे, याबाबत पेच निर्माण झाला आहे. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू एबी डिव्हिलियर्सचेही आता बरेच वय झाले आहे. त्याच वेळी, देवदत्त पडिक्कल कर्णधारपद सांभाळू शकतो की नाही हे कोणालाही सांगता येणार नाही.
आता याबाबत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, पुढील हंगामाच्या लिलावात कर्णधारपदासाठी आरसीबीला एखादा खेळाडू खरेदी करावा लागू शकतो. कारण देवदत्त पडिक्कल कर्णधार म्हणून स्वतः कसे सिद्ध करतो, याबद्दल काहीच सांगता येणार नाही.
त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आकाश चोप्राला एका चाहत्याने विचारले की पुढील वर्षी आरसीबीचा कर्णधार कोण बनू शकतो. या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला, ‘हा एक अतिशय अवघड प्रश्न आहे. देवदत्त पडिक्कलने कर्णधारपद सांभाळलेले, आम्ही अजून तरी पाहिलेले नाही. त्यामुळे तो कर्णधार कसा असेल हे कोणालाच ठाऊक नाही. सध्याच्या खेळाडूंमध्ये फक्त देवदत्त पडिक्कलचे नाव पुढे येत असल्याचे दिसत आहे. पण त्याच्या क्षमतेबद्दल कुणालाही माहिती नाही.’
आकाश चोप्राच्या मते, आरसीबीला लिलावात खेळाडू विकत घ्यावा लागेल, जेणेकरून ते त्याला कर्णधार बनवू शकतील. तो पुढे म्हणाला, ‘दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यरला आपल्या संघातून मुक्त केल्यास, तो कर्णधारपदाचा पर्याय असू शकतो. केएल राहुल पंजाबमध्ये कायम राहील का? जर त्याला सोडण्यात आले तर तो देखील एक पर्याय असू शकतो. तसेच मयांक अगरवाल आणि आर अश्विन आप आपल्या संघातून मुक्त झाले तर ते कर्णधार होऊ शकतात.’
यापूर्वी आरसीबीकडून खेळणारा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही केएल राहुलचे नाव सुचवले होते. त्याने म्हटले होते की, आरसीबी केएल राहुलला लिलावात खरेदी करेल आणि त्याला कर्णधार बनवू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याची गती कमी झाली, पण…’, भुवनेश्वर कुमारबद्दल माजी भारतीय क्रिकेटरची मोठी प्रतिक्रिया
वाईट झालं! पाकिस्तानाच्या ‘या’ खेळाडूच्या बहिणीचे निधन, भावनिक पोस्ट करत दिली माहिती