आयपीएलच्या पुढील हंगामात दोन नवीन संघ दाखल होणार आहेत. यासोबतच आयपीएलचा मेगा लिलाव देखील पार पडणार आहे. यासाठी विविध संघांनी आपआपली तयारी सुरू केली आहे. संघांनी कोण कोणत्या खेळाडूंना रिटेन करावे याबाबत देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने पुढील वर्षीच्या लिलावापूर्वी आरसीबीने कोणते चार खेळाडू कायम ठेवले पाहिजेत हे सांगताना धक्कादायक विधान केले आहे.
आकाश चोप्राने पुढील वर्षीच्या लिलावापूर्वी आरसीबीने कोणते चार खेळाडू कायम ठेवले पाहिजेत हे सांगितले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आकाश चोप्राने या यादीत अष्टपैलू फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा समावेश केलेला नाही. त्याने म्हटले आहे की, मॅक्सवेल कधी फॉर्मात येईल आणि कधी फॉर्मात नसेल यावर भरवसा नाही. आयपीएल २०२२ च्या आधी, अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने निवृत्तीची घोषणा केली आहे. डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आरसीबी संघात ग्लेन मॅक्सवेलला परदेशी खेळाडू म्हणून कायम ठेवण्याची शक्यता वाढली आहे. आकाश चोप्रा मात्र त्याला आरसीबी संघात कायम ठेवू इच्छित नाही.
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, तो आरसीबी संघात कोणते खेळाडू कायम ठेवणार आहे. तो म्हणाला, ‘विराट कोहली आणि युजवेंद्र चहल हे माझे पहिले दोन पर्याय असतील. जर मला आणखी दोन खेळाडूंना कायम ठेवायचे असेल तर मी मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कल यांना संघात कायम ठेवेन. हे माझे चार खेळाडू असतील ज्यांना मी आरसीबी संघात कायम ठेवीन. मी हर्षल पटेलचा देखील विचार करू शकतो. आता तुम्ही ग्लेन मॅक्सवेलचा विचार करत असाल पण मी त्याला आरसीबी संघात कायम ठेवणार नाही. कारण, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास नाही. सध्या तो चांगली कामगिरी करत आहे पण भविष्यातही तो असेच करत राहील हे सांगता येणार नाही. म्हणूनच त्याला संघात घेऊन मी धोका पत्करू शकणार नाही.’ आकाश चोप्राच्या मते, आरसीबीने परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंना कायम ठेवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण, त्याचा संघाला खूप फायदा होतो.