भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा हा विजयाच्या रथावर आरूढ आहे. जेव्हापासून तो भारतीय संघाचा नियमित कर्णधार बनला आहे तेव्हापासून भारतीय संघाची कामगिरी देखील सातत्याने चांगली होतीये. रोहितच्या नेतृत्वाचे जगातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटू कौतुक करत असतात. आता या यादीमध्ये आणखी एका माजी भारतीय क्रिकेटपटूचा समावेश झाला आहे.
भारतीय क्रिकेट संघासाठी दहा आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला आकाश चोप्रा जगातील प्रसिद्ध समालोचकांपैकी एक आहे. तो आपल्या युट्यूब चॅनेलवर सातत्याने क्रिकेट जगतातील घडामोडींवर प्रतिक्रिया देत असतो. आपल्या एका कार्यक्रमात रोहित शर्माचे कौतुक केले. रोहितविषयी बोलताना तो म्हणाला,
“रोहित शर्मा हा अतिशय वेगळा कर्णधार आहे. जेव्हा तुम्ही त्याला भेटता किंवा त्याला मैदानावर पाहता तेव्हा तो सातत्याने बोलताना किंवा हालचाल करताना दिसत नाही. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघ खूप आक्रमक क्रिकेट खेळतो. आपण खेळाडूंना मुक्तपणे किंवा आक्रमकपणे खेळताना पाहिले आहे. रोहित शर्माने खेळाडूंना संघातून वगळले जाणार नाही, असा पूर्ण विश्वास दिला आहे.”
रोहित शर्माने यापूर्वी म्हटले होते की, खेळाडूंमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये आणि सर्वांना त्यांची भूमिका पूर्णपणे स्पष्ट माहित असावी अशी माझी इच्छा आहे. मुंबई इंडियन्स आणि कर्णधारपदाच्या काळात मी गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात जास्त गुंतागुंत न करण्याचा प्रयत्न केला. मी खेळाडूंशी मोकळेपणाने बोलतो.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २७ ऑगस्टपासून आशिया चषकात सहभागी होईल. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी लोटला जनसागर, व्हिडिओ होतोयं भन्नाट व्हायरल
भारतीय संघाच्या कामगिरीवर कर्णधार खूष! ‘हा एक चांगला अनुभव होता’ म्हणत थोपटली पाठ
‘त्याच्यावर टीका होतेय, कारण…’ भारताच्या माजी कर्णधाराने केली पंतची पाठराखण