मुंबई । विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी जेव्हा लयीत असते तेव्हा भल्या भल्या गोलंदाजी आक्रमणाला फोडून काढल्या शिवाय राहत नाही. एका सामन्यात अशी वेळ आली होती की, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने या दोन दिग्गज फलंदाजाला बाद करण्यासाठी चक्क पंचांकडून सल्ला मागितला होता.
ऍरॉन फिंचने ज्या पंचाकडे सल्ला मागितला होता, ते पंच इंग्लंडचे 40 वर्षीय मायकल गॉ होते. याचा खुलासा खुद्द गॉ यांनी केला आहे.
गॉ एका संकेतस्थळाशी बोलताना म्हणाले, “मला आठवते की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरू होता. विराट कोहली आणि रोहित शर्मा मोठी भागीदारी केली होती. मी स्क्वेअर लेगवर उभा होतो. माझ्या बाजूला ऍरॉन फिंच थांबला होता. सामना सुरू असताना तो माझ्याकडे आला म्हणाला, या दोन दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहणे अविश्वसनीय आहे.”
“त्यानंतर मला त्याने विचारले की, या दोघांना बाद करण्यासाठी कशाप्रकारे गोलंदाजी करावी? त्यावर म्हणालो, मी माझे काम करत आहे आणि त्यात खूश आहे. आपल्याला जे करायचं आहे त्याचा विचार आपणच करावा.” गॉ यांनी डरहम या काउंटी क्रिकेट संघाकडून प्रथम श्रेणीचे सामने 67 खेळले आहेत. त्यांनी आतापर्यंत 62 सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात याच वर्षी वनडे मालिका खेळवण्यात आली होती. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विराट कोहली(89) आणि रोहित शर्माने (119) 137 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर 286 धावांचे लक्ष्य 3 गाड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.